धाडशी मुलीने दिव्यांग मुलाशी विवाह केला.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 29, 2020

धाडशी मुलीने दिव्यांग मुलाशी विवाह केला..

 धाडशी मुलीने दिव्यांग मुलाशी विवाह केला..
                                                        बुलडाणा (प्रतिनिधी):- चिखली तालुक्यात सध्या एका अनोख्या विवाहाची चर्चा आहे. एका मुलीने हात तुटलेल्या एका तरुणासोबत लग्न केले. आश्‍चर्यचकीत होण्यासारखी गोष्ट तुम्हाला वाटली असेल, पण यात आश्‍चर्य वाटण्यासारखे तिला काहीच वाटत नाही. कारणही तेवढेच विशेष आहे. त्यामुळे बातमी वाचल्यानंतर तुमच्या तोंडातून तिच्यासाठी शब्द बाहेर पडतील... वाहऽऽ याला म्हणतात, धाडसी मुलगी अन् प्रेम! विवाह या हिंदी चित्रपटाचे कथानकच जणू या ठिकाणी जसेच्या तसे उतरले आहे. फरक इतकाच की तिथे नायकाने धाडस केले आणि इथे या खर्‍याखुर्‍या नायिकेने...

चांधई (ता. चिखली) येथील विशाल दिनकर इंगळे आणि मंगरूळ नवघरे येथील प्रिया अंकुश घेवंदे यांचे तीन महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. नव्या वैवाहिक आयुष्याची, संसार फुलविण्याची स्वप्नं दोघांनीही बघायला सुरुवात केली. विशाल ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. सगळीकडे आनंदीआनंद, दोन्ही कुटुंबाची लग्नाची तयारी सुरू होती. मात्र बहुधा हा आनंद नियतीला बघवला गेला नसावा. लग्न ठरल्यानंतर एकाच महिन्यात विशाल यांचा देऊळगाव महीजवळ भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांचा डावा हात ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडला गेला. त्यांच्यावर औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र पूर्णतः निकामी झाल्याने डावा हात तोडावा लागला. वाहनचालक असल्याने ज्या हातांवर पोट होते, तोच हात राहिला नसल्याने आता पुढे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला.  उदरनिर्वाहाचे एकमेव साधनच हिरावले जाणार होते. आता कमाईचाच प्रश्‍न निर्माण झाला म्हटल्यावर लग्न तर मोडल्यातच जमा होते. मात्र याच काळात वेगळीच कथा जन्म घेत होती. प्रियाला विशालची ओढ लागली होती. तो उपचार घेऊन बरा होऊन येईल, आमचे लग्न होईल, अशी स्वप्ने ती रंगवत होती. रोज विशालला फोन करून तब्येची विचारपूस करायची. मात्र हातच निकामी झाल्यामुळे विशालने काळजावर दगड ठेवून तिला सत्य परिस्थिती सांगितली.
विशालला आता वाहन चालवता येणार नसल्यामुळे प्रियाच्या घरूनही या विवाहाला विरोध सुरू झाला. मात्र दुसरीकडे प्रियाने विशालला कायमचे स्वीकारले होते. तिने विशाललाच आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय घेतला. आमचे लग्न झाल्यानंतर हात तुटला असता तर स्वीकारलेच असते ना? लोक चार हातांनी संसार उभा करतात. आम्ही तीन हातांनी संसार उभा करू, असे म्हणत ती घरच्यांना समजावून सांगितली अन् तिच्या या निर्णयापुढे आई- वडिलांनाही नमते घ्यावे लागले. दोन्ही घरच्यांनी पुढाकार घेऊन दोघांचे काल, 27 नोव्हेंबरला मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत चांधई येथे  हा विवाह लावून दिला. या विवाहाची चर्चा कानावर येताच सारेच थक्क आहेत आणि प्रियाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. थोड्याशा स्वार्थापोटी प्रेम अन् कर्तव्य विसरून जाणार्‍या तरुणाईपुढे प्रियाने जणू आदर्शच ठेवला असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment