गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे येतात कुठून याचा तपास होईल का मुळाशी?सांगली(प्रतिनिधी):- सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे हस्तगत करण्याच्या घटना समोर आल्या आहेत.गुन्हेगारांच्या हातात चाकू, सुरा, तलवारीऐवजी आता पिस्तूल, रिव्हॉल्व्हर सर्रास दिसू लागली आहेत. गुन्हेगारांच्या जोडीला वाळू माफियासुद्धा बेकायदा शस्त्रे बाळगू लागले आहेत. दमदाटी, धमकावणे, वसुली यासाठी त्याचा वापर वाढत आहे. या शस्त्राची तस्करी करणाऱ्या टोळ्या उघडकीस येत आहेत. या व्यवसायाची धागे दोरे परराज्यात असली,तरी राज्यातही याचे दलाल सक्रिय आहेत. अलीकडे अशा प्रकरणात कोणतीही मोठी कारवाई झालेली नाही. अगदी चार-पाच हजारांपासून ही गावठी पिस्तुले उपब्लब्ध
होतात. त्यामुळेच कधी शस्त्रे बाळगणारा, कधी खरेदी करणारा, तर कधी विक्रीसाठी आणणारा पोलिसांच्या जाळ्यात सापडतो. तपासात ही शस्त्रे परराज्यातून आल्याचे पोलिस सांगतात. मात्र विकणार्याने शस्त्र कोठून आणले,त्याचे कोणाशी लागेबांधे आहेत, ते कुठे तयार झाले, असे प्रश्न अनुत्तरितच राहतात.तपासामध्ये मुख्य दलालापर्यंत पोलिस पोहोचतही नाहीत.ज्या ठिकाणाहून पिस्तूल आणले, त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यात पोलिसांना अपयश आले आहे.पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगलीचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध शस्त्र तस्करांसह गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मिरजेत दोन ठिकाणी कारवाई केल्या. त्यात तीन पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली. मात्र, ही पिस्तुले येतात कोठून याची मुळापर्यंत चौकशी होणं गरजेचं आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय.
No comments:
Post a Comment