पत्रकारांची मोट बांधून त्यांना एका व्यासपिठावर आणण्याचे काम खर्या अर्थाने करणारे विश्वासराव आरोटे ..
बारामती:-ग्रामीण पत्रकारांच्या विविध समस्यांचा गेली दशकभर सातत्याने पाठपुरावा करुन त्या सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न करुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर करण्यात महत्वाची भूमिका बजावलेले व्यक्तिमत्व म्हणजे संघाचे विद्यमान सरचिटणीस विश्वासराव आरोटे होय.
चितळवेढे (ता.अकोले, जि.अहमदनगर) या छोट्याशा गावी जन्म. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करुन मिळेल ते काम करत गेले. अनेक अडचणी आल्या. पतसंस्थेत शिपाई पदावर काम केले. दूध विक्री केली. याचवेळी वर्तमानपत्र विक्रीचेही काम सुरु केले. हे काम करत असतानाच पत्रकारीतेची ओळख झाली. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत वृत्तपत्र पोहचवायचे असेल तर त्या वृत्तपत्रात ग्रामीण भागातील समस्या मांडण्याच्या हेतूने लेखन सुरु केले. या समस्या मांडत असतानाही अनेक अडचणी आल्या. राजकीय अथवा स्वहिताला प्राधान्य न देता लेखन सुरु ठेवले. येथून सुरु झालेली ही बातमीदारी त्यांना मोठ्या पदावर घेऊन गेली. वार्ताहर म्हणून अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केल्यानंतर तालुका प्रतिनिधी आणि नंतर विभागीय कार्यालयाचे उपसंपादक म्हणून त्यांनी ‘दैनिक गांवकरी’ या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. गांवकरीच्या माध्यमातून ग्रामीण भागाची, या भागातील ग्रामस्थांची विश्वासार्हता जपली. त्यांचे प्रश्न आपल्या लेखनीच्या माध्यमातून सातत्याने मांडले. पत्रकारीता करत असतानाच ग्रामीण भागातील पत्रकारांशी देखील त्यांची नाळ जोडली गेली. या पत्रकारांच्या समस्या त्यांना आपल्या समस्या वाटू लागल्या. या समस्या सोडविण्यासाठी काही तरी केले पाहिजे, असे सारखे वाटत होते. त्यांनी ग्रामीण भागात काम करणार्या पत्रकारांची मोट बांधली. सर्वांना बरोबर घेऊन अकोले तालुका ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली. या पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांसाठी खर्या अर्थाने कार्य सुरु केले. हे काम करत असतानाच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे यांचा संपर्क आला. दोघांचेही ध्येय एकच.. पत्रकारांच्या समस्या सातत्याने मांडून त्यासाठी राज्यस्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे. ध्येय्य एकच असल्याने या जोडगोळीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून एकत्रित काम सुरु केले.
पत्रकारांसाठी चालविल्या जात असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय अधिवेशने घेतली. जिल्ह्यात, तालुक्यात विविध मेळावे घेतले. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील पत्रकारांना या पत्रकार संघामध्ये सामावून घेतले. प्रत्येकाला संघाचे ओळखपत्र देऊन नवी ओळख दिली. सर्वच जिल्ह्यातील पत्रकारांचा विमा काढून खर्या अर्थाने पत्रकार संघ या पत्रकारांसाठी काम करत असल्याचा विश्वास निर्माण केला. संघटनेच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अहमदनगर जिल्ह्याध्यक्ष आणि नंतर राज्य सरचिटणीस या पदावर काम करण्याची संधी दिली. राज्य कार्यकारिणीवर काम करतानाच त्यांचे काम अतिशय जोमाने सुरु झाले. स्पर्धा परीक्षांबरोबरच क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या गुणवंतांचा राज्यस्तरावर गौरव पत्रकार संघाच्या माध्यमातून केला जात आहे. हलाखीची परिस्थिती असणार्या पत्रकारांना औषधोपचारासाठी व इतर गरजा भागविण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही विश्वासराव आरोटे यांनी केला आहे. अशा राज्यभरातून अनेक पत्रकारांना संघटनेने आर्थिक मदत केली आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, बाळासाहेब विखे, सुशिलकुमार शिंदे, समाजसेवक अण्णा हजारे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील, दिवंगत गोपीनाथ मुंडे, माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री दिलीप वळसे, पद्माकर वळवी, रामराजे निंबाळकर, बबनराव पाचपुते, बाळासाहेब थोरात, विद्यमान पालकमंत्री राम शिंदे, महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, एकनाथ शिंदे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आदींकडे त्यांनी सातत्याने पत्रकारांच्या विविध समस्या मांडल्या.
पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी संरक्षण कायदा व्हावा यासाठी ते नेहमीच आग्रही राहीले. पत्रकारांवर होणार्या हल्ल्यांचा निषेध करत आरोपींना अटक होईपर्यंत पाठपुरावा केला. ग्रामीण भागातील पत्रकारांनाही श्रमिक पत्रकारांप्रमाणेच अॅक्रीडीशन कार्ड मिळावे, एस. टी. बस तसेच रेल्वेसारख्या विविध सवलती मिळाव्यात, शासनाने त्यांचा आरोग्य विमा काढावा, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, पत्रकारांना निवासासी व्यवस्था उपलब्ध करावी या व अशा अनेक मागण्यांसाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न विश्वासराव आरोटे करत आहेत.
उत्तर महाराष्ट्राबरोबरच मराठवाडा आणि विदर्भातही पत्रकारांची मोट बांधून त्यांना एका व्यासपिठावर आणण्याचे काम खर्या अर्थाने विश्वासराव आरोटे यांनी केले आहे. त्यामुळे शासनाकडून जरी या चौथ्या स्तंभाला संरक्षण मिळत नसले तरी पत्रकार संघटना भक्कमपणे या पत्रकारांच्या मागे उभी आहे. त्यांच्यावरील अन्यायाला तोंड देण्यासाठी सक्षम आहे असा विश्वास पत्रकारांच्या मनात निर्माण करण्यासाठी विश्वासराव आरोटे यांनी अथक परिश्रम घेतले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर शासनाचा यशवंतराव चव्हाण पत्रकारीता पुरस्कार तसेच विविध पुरस्कार मान्यवरांच्याहस्ते प्राप्त झाले आहेत. त्यांचे हे कार्य असेच तहहयात सुरु रहावे, हीच अपेक्षा! नवनाथ जाधव प्रदेश प्रसिध्दी प्रमुख महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई
No comments:
Post a Comment