महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूकदार कृती समिती स्थापन अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांची निवड..
बारामती:-महाराष्ट्रातील विविध विद्यार्थी वाहतूकदार महासंघ, जिल्हा संघ, तालुका संघ व इतर विद्यार्थी वाहतूक संघटनांनी शासन दरबारी अनेकवेळा पत्रव्यवहार, आंदोलने निदर्शने करून सुद्धा समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे न्याय्य हक्कासाठी व विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटित होऊन शासन दरबारी न्याय मागण्याचे हेतूने महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी वाहतूक संघटनांची नुकतीच शासकीय विश्रामगृह बारामती येथे कृती समिती स्थापन करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत विविध संघटनांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची चर्चा केली त्यामध्ये वाहतूकदारांच्या साठी कल्याणकारी मंडळ असावे, इन्शुरन्स मुदतवाढ मिळावी,टॅक्स माफी तसेच फायनान्स कंपन्यांकडून होणारा मानसिक छळ,गेल्या ११महिन्यापासून आलेली उपासमारीची वेळ, वाहनांसाठी वयोमर्यादा वाढविणे अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली. या विविध प्रश्नांसाठी शासनाबरोबर एकत्रित चर्चा किंवा वेळ पडल्यास लढा देण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याबाबत एकमत झाले.याकरिता महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूकदार कृती समिती स्थापन करण्यासाठी सर्वांनी पाठिंबा देऊन समिती
स्थापन केली. समितीच्या अध्यक्षपदी उपोषण सम्राट व सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांची निवड करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ,भगवे वादळ विद्यार्थी वाहतूक महासंघ महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेना, बारामती विद्यार्थी वाहतूक संघ, परिवर्तन विद्यार्थी वाहतूक नवी मुंबई, पनवेल विद्यार्थी वाहतूक संघ,रायगड विद्यार्थी वाहतूक संघ, महाड विद्यार्थी वाहतूक ,अमरावती विद्यार्थी वाहतूक संघ,शिवप्रकाश विद्यार्थी वाहतूक संघ सोलापूर, जय संघर्ष विद्यार्थी वाहतूक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, लातूर विद्यार्थी वाहतूक संघटना,अकलूज ,इंदापूर पुणे,पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद ,नगर ,सातारा(शिळवर, लोनंद, खंडाळा,खोपोली वाहतूक संघटना अशा अनेक वाहतूक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या समितीमध्ये उपस्थितांनी समितीवर आपले सदस्य नियुक्त केले व इतर अनुपस्थित जिल्हा सदस्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात येणार आहे.या समितीमध्ये पांडुरंग हुमने ,तानाजी बांदल,संतोष जाधव,योगेश बोऱ्हाडे. मारुती सावंत,संतोष गोळे ,महादेव कुलकर्णी, रवींद्र गुल्हाने,गणेश बोराटे, लक्ष्मण वाघे, राहुल इंगळे, शंकर आमंते,अरविंद,भाकरे, राजेश भगत यांचा समावेश करण्यात आला.शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यभरातील विविध संघटना तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.मदर मिटिंगसाठी बारामती विद्यार्थी वाहतूक संघटनेने खूप परिश्रम घेतले.यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.शेवटी राजेश भगत यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment