*खा. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून मंगळवारी दिव्यांग वधू वर सूचक मेळावा*
पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि अपंग हक्क पुनर्वसन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त येत्या मंगळवारी (दि. २३) मार्केट यार्ड येथील निसर्ग कार्यालयात हा मेळावा होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी नऊ वाजता या मेळाव्याचे उदघाटन करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणचे समन्वयक विजय कान्हेकर यांनी ही माहिती दिली. राज्यातील जास्तीत जास्त विवाहेच्छूक दिव्यांग तरुण तरुणींनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा हा मेळावा असून याद्वारे ज्यांचे विवाह जुळतील त्यांचे लग्न पूर्णतः मोफत लावून देण्यात येणार आहेत. या मेळाव्याला जास्तीत जास्त दिव्यांग तरुण तरुणी उपास्थित रहावेत यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी यशवंतराव प्रतिष्ठाण येथे अशोक सोळंके अथवा पुण्यातील सुप्रिया सुळे यांचे संपर्क कार्यालय असलेल्या निसर्ग कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment