*महाराष्ट्राच्या ५४व्या निरंकारी संत समागमाचा शुभारंभ*
(अशोक कांबळे यांजकडून)
बारामती : सत्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन सानिध्यात महाराष्ट्राच्या ५४व्या तीन-दिवसीय प्रादेशिक निरंकारी संत समागमागमाचा भव्य शुभारंभ हर्षोल्हासपूर्ण वातावरणात आज २६ फेब्रुवारी रोजी ‘सम्पूर्ण अवतार वाणी’ तसेच ‘सम्पूर्ण हरदेव वाणी’च्या पदांच्या गायनाने झाला.
समागमाचे प्रसारण व्हर्च्युअल रूपात सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत निरंकारी मिशनची वेबसाईट आणि संस्कार टी.व्ही. चॅनलवर होत असून त्याचा आनंद जगभरातील समस्त भाविक भक्तगण आणि प्रभुप्रेमी सज्जन प्राप्त करतील. या कार्यक्रमामध्ये सद्गुरुच्या पावन दर्शनाबरोबरच भक्तीसंगीत आणि व्याख्यानांच्या माध्यमातून संत-महात्म्यांचे ओजस्वी व प्रेरणादायी विचार श्रवण करता येतील. या वर्षी कोरोना महामारीमुळे समागमाची व्यवस्था व्हच्र्युअल रूपात अशा प्रकारे करण्यात आली आहे ज्यायोगे भक्तगणांना तशीच अनुभूती यावी जशी खुल्या प्रांगणातील समागम मंडपामध्ये बसून मिळते.
या वर्षी समागमाचा मुख्य विषय ‘स्थिरता’ ठेवण्यात आला आहे. मानवतेने युक्त सहज, सरळ व सुंदर जीवन जगण्यासाठी जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये स्थिरतेची नितांत आवश्यकता आहे. मग ही स्थिरता आहे तरी काय? ती प्राप्त करण्याचा उपाय कोणता आणि मानवी जीवनाशी तिचा संबंध तरी काय आहे? या सर्व तथ्यांच्या बाबतीत समागमाच्या तिन्ही दिवशी वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चा केली जाईल. प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाच्या शेवटी सत्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल.
पूर्वेतिहास पाहिला तर दरवर्षी समागमाचा प्रारंभ महाराष्ट्राच्या विविध भागांसह देशाच्या इतर प्रांतांतील लोकसंस्कृतींचे प्रतिनिधित्व करत अनेकतेत एकतेचे दर्शन घडविणाऱ्या रंगीबेरंगी शोभायात्रेद्वारे होत आला आहे. तथापि, या वर्षी समागमामध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बोलीभाषांसह देशातील अन्य भाषांच्या माध्यमातून भक्तीगीते, अभंगवाणी, कविता आणि व्याख्यानांच्या माध्यमातून अनेकतेत एकतेचा अद्भुत संगम पहायला मिळेल ज्यातून सर्वांना सद्भाव आणि एकत्वाची प्रेरणा प्राप्त होईल.
No comments:
Post a Comment