महाराष्ट्राचा 54वा निरंकारी संत समागम,वास्तविक मनुष्य होण्यासाठी आपल्यात मानवी गुण असणे आवश्यक - सदुरु माता सुदीक्षाजी महाराज - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

महाराष्ट्राचा 54वा निरंकारी संत समागम,वास्तविक मनुष्य होण्यासाठी आपल्यात मानवी गुण असणे आवश्यक - सदुरु माता सुदीक्षाजी महाराज

महाराष्ट्राचा 54वा निरंकारी संत समागम,वास्तविक मनुष्य होण्यासाठी आपल्यात मानवी गुण असणे आवश्यक - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

   बारामती (प्रतिनिधी) -  ‘‘आपण स्वत:ला वास्तविक मनुष्य म्हणवून घेत असू तर आपल्यामध्ये मानवी गुण असण्याची नितांत गरज आहे. या विपरीत कोणतीही भावना मनामध्ये येत असेल तर स्वतःचे मूल्यांकन करावे लागेल, सूक्ष्म नजरेने मनाच्या तराजूत तोलून पहावे लागेल. असे केले तर आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला उमगू शकेल.’’ असे प्रेरणादायी विचार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या तीन-दिवसीय 54व्या वार्षिक संत समागमाच्या समारोप प्रसंगी काढले. 28 फेब्रुवारी रोजी या संत समागमाची यशस्वीपणे सांगता झाली. 
व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आलेला हा तीन-दिवसीय संत समागम जीवनाला एक नवी दिशा, ऊर्जा आणि सकारात्मकता देऊन गेला. समागमाचे थेट प्रसारण निरंकारी मिशनची वेबसाईट तसेच संस्कार टी.व्ही. चॅनलच्या माध्यमातून करण्यात आले. संपूर्ण भारतासह विदेशातील लाखो निरंकारी भक्तांनी तसेच अन्य भाविक सज्जनांनी घरबसल्या या संत समागमाचा भरपूर आनंद प्राप्त केला. 
सद्गुरु माता सुदीक्षाजी म्हणाल्या, की वास्तविक मनुष्य होण्यासाठी सकळजनांवर प्रेम करणे, सर्वांच्या प्रति सहानुभूती बाळगणे, उदारमतवादी होऊन इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष करुन त्यांच्यातील सद्गुण ग्रहण करणे, सर्वांना समदृष्टीने पाहणे आणि आत्मवत भावनेने इतरांचे दुःखदेखील स्वतःच्या दुःखासमान मानणे यांसह इतरही अनेक मानवी गुणांनी युक्त होण्याची आवश्यकता आहे. 
माता सुदीक्षाजी यांनी पुढे सांगितले, की मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो, आपल्या धर्मातील गुरु-पीर-पैगंबरांच्या वचनांचे पालन करण्याचा दावा करतो. आपली कुठेही श्रद्धा असू द्या, प्रत्येक ठिकाणी मानवता हाच खरा धर्म असून ईश्वराशी नाते जोडून आपले जीवन सार्थक करावे अशीच शिकवण दिली गेल्याचे आढळते. जीवन अनमोल आहे. कोणत्याही वयात असलेला मनुष्य ब्रह्मज्ञानी संतांच्या सान्निध्यात येऊन ईश्वराला क्षणार्धात जाणू शकतो.
संत समागमाच्या पहिल्या दिवशी सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितले, की ईश्वराला कोणत्याही नावाने संबोधित करा. तो सर्वव्यापी असून कणकणवासी आहे. प्रत्येकाचा आत्मा हा निराकार ईश्वराचाच अंश आहे. आम्हाला स्वतःची खरी ओळख करुन घ्यायची असेल तर आधी परमात्म्याची ओळख करुन घ्यावी लागेल. कारण ब्रह्मानुभूतीनेच आत्मानुभूती शक्य आहे. स्थिर प्रभूशी नाते जोडल्याने आपल्याला स्थिरतेबरोबरच शांती व समाधानही लाभते. परमात्मा समस्त विश्वाचा कर्ता-धर्ता आहे. याची अनुभूती झाल्यानंतर प्रत्येक कार्य सहजतेने स्वीकारण्याची युक्ती प्राप्त होते. स्थिर परमात्म्याचा आधार घेतल्याने जीवनातील चढ-उतारांमध्येही समाधानाची अवस्था टिकून राहते.  
सद्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक स्थितीचे आकलन करण्यासाठी, शरीराचे उचित संचालन करण्यासाठी ज्ञानेंद्रियांचा वापर करावा, मात्र त्यांच्या अधीन होऊ नये.  इंद्रिये आपल्या नियंत्रणात असतील तर आपण त्यांचा सदुपयोग करुन घेऊ शकतो. याकरिता इंद्रियांमध्ये गुंतून न जाता त्यांना आपल्या काबूत ठेवायचे आहे.
सेवादल रॅली
समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ एका रोमहर्षक सेवादल रॅलीने झाला. त्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील सेवादल बंधु-भगिनींनी भाग घेतला. रॅलीमध्ये शारीरिक कवायती व्यतिरिक्त विविध खेळ आणि मल्लखांब, मानवी मनोरे यांसारख्या साहसी करामती दाखविण्यात आल्या. शिवाय मिशनच्या शिकवणूकीवर आधारित लघुनाटिकाही प्रस्तुत करण्यात आल्या. 
सेवादल रॅलीमध्ये आपला आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की अवघ्या मानवतेला आपला परिवार मानून, अभिमानाला त्यागून, समयाची गरज लक्षात घेऊन, मर्यादा व अनुशासनामध्ये राहून मिशनकडून वर्षानुवर्षे सेवेचे योगदान दिले जात आहे. सेवा करताना प्रत्येकाला ईश्वराचा अंश मानून सेवा करायला हवी कारण मानवसेवा ही परमात्म्याचीच सेवा होय.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी झालेल्या सत्संग समारोहाला संबोधित करताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की जीवनात स्थिरता आणण्यासाठी सजगता आणि विवेकाची गरज असते आणि त्यासाठी आपण परमात्म्याला आपल्या हृदयात स्थान देण्याची आवश्यकता आहे. हृदयांतरी ईश्वराचा निवास झाल्यावर मन आपोआपच निर्मळ होते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेला स्थान उरत नाही.  
सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की मागील संतांचे दाखले पाहिले तर त्यांनीही हेच सांगितले आहे, की या ईश्वराला खुल्या नयनांनी पाहिले जाऊ शकते. परमात्म्याला पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या निजस्वरूपाची ओळख होते. आपण शरीर नसून आत्मा आहोत याची जाणीव होते. या बोधाने आपण जीवनाला योग्य दिशा देऊ शकतो. युगानुयुगे संतांनी, भक्तांनी हेच सांगितले, की परमात्म्याशी नाते जोडून भक्तिमार्गाने चालूनच जीवनाचे कल्याण होऊ शकते. तसेच आपला आत्मा बंधनमुक्त होऊन मोक्ष प्राप्त करु शकतो.
कवि दरबार
समागमाच्या तिसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण होते बहुभाषी कवी संमेलन, ज्याचे शीर्षक ‘स्थिरतेशी नाते मनाचे जोडून, जीवन आपले सहज करुया’ असे होते. या विषयावर आधारित मराठी, हिंदी, सिंधी, गुजराती, पंजाबी आणि भोजपूरी भाषांमधून कित्येक कविंनी आपल्या कविता सादर केल्या. या कवी संमेलनामध्ये जीवनातील अस्थिरतेची कारणे, स्थिरतेची गरज आणि स्थिरतेचे उपाय यावर प्रभावशाली रीतीने कवी सज्जनांनी प्रबोधन केले. 
समागमाच्या तिन्ही दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या भागातील तसेच जवळपासच्या राज्यांसह देशाच्या काही प्रांतांतील व विदेशातील अनेक वक्त्यांनी विविध भाषांतून आपले प्रेरणादायी विचार व्यक्त केले. याशिवाय संपूर्ण अवतार बाणी आणि संपूर्ण हरदेव बाणीतील पावन पदांचे कीर्तन, पुरातन संतांची अभंगवाणी तसेच मिशनच्या गीतकारांनी तयार केलेल्या प्रेरणादायी भक्तीरचना प्रस्तुत करुन मिशनच्या विचारधारेवर आधारित सारगर्भित संदेश प्रसारित करण्यात आला.

No comments:

Post a Comment