खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून संसद महारत्न पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला अर्पण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून संसद महारत्न पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला अर्पण

*खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून संसद महारत्न पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला अर्पण*
                                                         *दिल्ली येथे पुरस्कार वितरणानंतर व्यक्त केल्या भावना*
                                                           दिल्ली, २० (प्रतिनिधी) - जनतेने दाखविलेला विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावर संसदेत जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेला संसद महारत्न पुरस्कार माझा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव आहे. या जनतेलाच मी हा पुरस्कार समर्पित करीत आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन-प्रिसेन्स ई-मॅगेझिनच्या वतीने दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न आणि सलग सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूट क्लब सभागृहात आज प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोळाव्या लोकसभेत सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली. यासाठी त्यांना फाऊंडेशन तर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार, तर सतराव्या लोकसभेतही सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम असून त्यांनी ८९ टक्के उपस्थिती लावत १२२ चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात एकूण त्यांनी २८६ प्रश्न  विचारले असून चार खासगी विधेयके मांडली आहेत या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. गेल्या १२ वर्षांपासून लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फाउंडेशनतर्फे संसद पुरस्कार दिला जातो. संसदे अधिवेशनातील खासदारांची उपस्थिती, चर्चासत्रांतील सहभाग, खासगी विधेयके आणि सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न इत्यादी निकषांवर पुरस्कारासाठी खासदारांची निवड केली जाते.
या पुरस्कारासाठी सुळे यांनी प्राईम पॉईंट आणि प्रिसेन्स इ मॅगेझिनसह बारामती लोकसभा मतदार संघातील समस्त जनतेचे आभार मानले आहेत.
आपल्या बारामती मतदार संघातील मतदारांनी विश्वास दाखवल्यामुळेच आपल्याला संसदेत काम करता आले. हे दोन्ही पुरस्कार आपण महाराष्ट्रातील जनतेला अर्पण करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. आपण सर्वांनी विश्वास टाकत सातत्याने आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यामुळे प्रांजळपणाने नमूद करावे वाटते की, आपला विश्वास हीच आपल्यासाठी खरी उर्जा आहे. यामुळेच जनहिताच्या मुद्यांना संसदेत मांडता आले, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Post a Comment