कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीची
आढावा बैठक संपन्न
बारामती शहरातील आस्थापना/दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू राहणार
- उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे
बारामती दि.22:- बारामती तालुक्यात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना व घेण्यात येणा-या निर्णयाबाबतची बैठक आज पार पडली.
यावेळी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, सिल्वर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव व बारामती शहरातील व्यापारी प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
प्रथम उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी कोरोना नियंत्रित करण्यासाठी करण्यात येणा-या विविध उपाययोजनांवर सर्व यंत्रणाशी चर्चा केली. त्यानंतर ते म्हणाले की, बारामती शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुभाव नियंत्रीत करण्यासाठी बैठकीत झालेल्या निर्णयानुसार उद्यापासून बारामती शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू राहतील. मात्र हॉटेलची पार्सल सेवा सायंकाळी सात पासून रात्री दहापर्यंत चालू राहील, असा निर्णय प्रशासनाने या बैठकीत घेतला. बारामती शहरातील सूर्यनगरी, गणेश मंडई व ग्रामीण भागातील माळेगाव ब्रु., पणदरे, गुणवडी ही कोरोनाची हॉट स्पॉट ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करुन सर्वेक्षण व टेस्टींग तात्काळ करण्यात यावे, तसेच जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या SOP प्रमाणे 50% कर्मचा-यांच्या उपस्थित आस्थापना चालवण्यात यावी, SOP चे प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावे तसेच जे नियम पाळत नाहीत त्यांची आस्थापना /दुकाने सिल करण्याची कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी कोव्हिड विषयचे आदेश, नियम व SOP नुसार कारवाई करावी असे, आदेशही त्यांनी दिले.
सर्व आस्थापनाचे मालक व चालक यांनी प्रशासनास सहकार्य करावे, त्यांच्या आस्थापनेत/दुकानात सॅनिटायझर ठेवावे, No Mask No Entry असा बोर्ड लावण्यात यावा, संबंधित आस्थापनाचे मालक/चालक व त्यामधील सर्व कर्मचारी यांनी कायमस्वरुपी मास्काचा वापर करावा, सामाजिक अंतराबाबच्या नियमांचे पालन करावे, ग्राहक नोंदी साठी स्वतंत्र नोंदवही ठेवून ग्राहकांचे नाव व मोबाईल क्रमांक व स्वाक्षरी घेण्यात यावी, प्रवेशद्वाराजवळ ऑक्सीमीटर, थर्मल स्कॅनिंग गनचा वापर करावा, संपूर्ण आस्थापना वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे, स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी यावेळी दिले.
शासन व प्रशासन यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिंस्टसिंग व शासनाच्या सूचनांचे पालन करावे असे, आवाहनही यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.
No comments:
Post a Comment