सावळ वनक्षेत्रात एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने पाणीपुरवठा..जागतिक वनदिन आणि पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
बारामती :-उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून वनक्षेत्रातील पाण्याचे स्त्रोतही संपत आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यजीवांच्या पाण्याची गैरसोय होवू नये या उद्देशानं पावसाळ्यापर्यंत एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने जागतिक वनदिन, जागतिक जलदिन आणि युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. जागतिक वनदिनानिमित्त यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.
फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी उन्हाळा असेपर्यंत बारामती व इंदापूर तालुक्यातील वन्यपरिक्षेत्रात वन्यजीवांसाठी टँकरमार्फत पाणी सोडणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार जागतिक वनदिनाचे व पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज रविवारी (दि. २१) बारामती तालुक्यातील सावळ येथील वनक्षेत्रातील पाण्याच्या टाकीत टँकर द्वारे पाणी सोडण्यात आले.
बारामती वनपरिक्षेत्रात पारवडी, शिर्सुफळ, नारोळी, वढाणे, मोढवे, मुढाळे, साबळेवाडी या परिसरात काही ठिकाणी प्रत्येकी दोन तर काही ठिकाणी तीन असे एकूण १९ पाणवठे आहेत. येथे नैसर्गिक पाणी उपलब्ध असते. त्या ठिकाण वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी तेथे नियमित येतात. यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने अनेक ठिकाणचे पाणी आटले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीचा विचार करुन फोरमच्या वतीने प्राण्यांसाठी पाणी देण्यात येणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार आजपासून वनक्षेत्रात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
आज सावळ येथे झालेल्या कार्यक्रमावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल पी.डी. चौधरी, वनरक्षक मीनाक्षी गुरव, संध्या कांबळे, माया काळे, अर्चना कवितके, अनिल काळिंगे, प्रकाश लोंढे यांच्यासह एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment