कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती नगरपरिषदेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना
बारामती दि.05 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती नगरपरिषद प्रशासन आणि शासन यांचेकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांना अनुसरून उपाययोजना करीत आहे. नगरपरिषदेमध्ये कोरोना विषयक मदतीसाठी कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना यापूर्वीच केलेली आहे. त्यामधून कोरोनाबाधीत रूग्णांचा शोध घेणे, रूग्णांना रूग्णालयीन व्यवस्थेबाबत माहिती देणे, रूग्णांचा कोरोना आजारबाबत पाठपुरावा घेणे इत्यादी कामे या कक्षामधून केली जातात.
शहरातील एकूण 46 शाळा , कॉलेज , खासगी शिकवणी वर्ग, लायब्ररी , ग्रंथालय यांना 14 मार्च 2021 पर्यत आपल्या संस्था बंद ठेवण्याबाबत लेखी कळविले आहे. सध्या लग्नसराई सुरू असून लग्न कार्यालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे शासनाकडून प्राप्त सूचनांना अनुसरून शहरातील 32 लग्नकार्यालय व सभागृहे यांना प्रत्यक्ष भेटी देऊन क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत कोरोना कालावधीत लग्नसमारंभ आयोजनाबाबत विविध सूचना देण्यात आल्या आहेत. लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांसाठी कार्यालयामध्ये 200 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत, समारंभात उपस्थित सर्व वऱ्हाडी , वाढपी, आचारी, आयोजक यांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे. तसेच वातानुकूलित सेवेचा (एसीचा) वापर न करणे बाबत , प्रवेशव्दारावर ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनिंग मशीनचा वापर करणे , उपस्थितांचे नाव , संपर्क तपशील ठेवणेबाबत तसचे लग्न कार्यालयाची मुख्य इमारत व संपूर्ण आवार सॅनिटायझरने निर्जंतूक करणे इत्यादी सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे घरोघर जाऊन ऑक्सिमीटर , थर्मल स्कॅनिंग मशीनव्दारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे काम पुन्हा चालू केले आहे. अतिजोखमीच्या सहवासी यांचे लक्षणानुसार व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तात्काळ टेस्टिंग अथवा rt – pcr नमुना तपासणी करून अहवाल येईपर्यत संस्थात्मक विलगीकरण करणे किंवा कोवीड केअर सेंटर येथे दाखल होणेबाबत सूचना देखील करण्यात येत आहेत. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामधील नर्सेसमार्फत दररोज कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच कोरोना रूग्णांच्या सद्यस्थितीबाबतची माहिती अद्ययावत केली जाते.
शहरातील नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षेसाठी पेालीस विभाग , परिवहन विभाग व नगरपरिषद यांच्या सहकार्याने शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्या , सोशल डिस्टंटिगचे पालन न करणाऱ्या त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणाऱ्या नागरिकांना आर्थिक दंड करून कायदेशीर कारवाई करण्याची मोहिम देखील तीव्र केलेली आहे. कोरोनाविषयक नियमावलीचे पालन न करणाऱ्या संस्था लग्नकार्यालये यावरही दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातील सर्व नागरिकांनी कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना व आदेश यांचे पालन करावे. स्वत:च्या कुटूंबियांच्या व शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेसाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment