एक बिघडलेला मुलगा ते व्यावसायिकांना कर्ज देणाऱ्या महा-रजतचा अध्यक्ष उमेश चव्हाण यांचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास"
पुणे:-रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांचा जन्म ८ एप्रिल १९८९ रोजी पुण्यातील धानोरी गावात झाला. आज धानोरी गाव पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मुख्य गाव म्हणून ओळखले जाते. उमेश चव्हाण यांचे वडील केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयांतर्गत असणाऱ्या आर. अँड डी. या कंपनीमध्ये सरकारी नोकरीत होते. वडिलांचे नाव भगवानराव तर आईचे नाव पुष्पलता. उमेश चव्हाण यांना तीन मोठ्या बहिणी आहेत. तिघा बहिणींच्या पाठीवर जन्म झालेला एकुलता एक मुलगा म्हणून घरात त्याचे फार कौतुक आणि लाड पुरविले जात.
उमेश चव्हाण यांची आई पुष्पलता चव्हाण एका हेडमास्तरची म्हणजे मुख्याध्यापकांची मुलगी. आई कडक शिस्तीची. त्यामुळे मोठ्या तिघी बहिणी अभ्यासात प्रचंड हुशार! शाळेतील सर्वात हुशार मुलींमध्ये त्यांची गणना होती. मात्र उमेश खेळकर आणि खोडकर. अभ्यास केला असता तर निश्चि तपणे मोठ्या बहिणींच्या सारखा शाळेत अभ्यासात चमकला असता. मात्र फक्त अभ्यासच करेल तो उमेश कसला?
उमेश चव्हाण यांचे दहावीचे वर्गशिक्षक बी.के. झावरे सांगतात, “उमेश अभ्यासामध्ये हुशार होता. मात्र गृहपाठ वेळेवर कधीच करत नसे. खोडकर आणि टारगट मुलांच्या मध्ये त्याचा जास्त वेळ जाई. मात्र शाळेमध्ये कुठलेही मोठे कार्यक्रम असले की, गुणवंत विद्यार्थी भाषण करत असत. भाषण करण्यामध्ये त्याचा पूर्वीपासून मोठा हातखंडा होता. त्यामुळे सर्व शिक्षक मंडळी भाषणाच्या वेळी एकमुखाने उमेशचे नाव सुचवायचे. उनाड असला तरी शिक्षकांना प्रिय विद्यार्थी होता.
दहावीनंतर ‘अनेक प्रकारचे’ मित्र मिळत गेले. जितके मित्र तितक्याच मैत्रिणी. यामध्ये बऱ्याच वाईट सवयीसुद्धा लागल्या. उमेश चव्हाण सांगतात, “आम्ही मित्रमंडळी गप्पा मारत असू त्यावेळी श्रीमंत व्यक्तींच्या बद्दल बरीच माहिती एकमेकांकडून समजत असे. मध्येच कोणी तरी सांगायचं अमुक-अमुक आमदार होता. पूर्वी त्याचा दारूचा धंदा होता. त्यातूनच त्याने करोडो रुपये छापले.’’ शाळेतलाच सवंगडी ‘गवळी’ आणि उमेशने आपण सुद्धा दारूचा धंदा करायचा, आणि श्रीमंत झालो की, राजकारणात जायचे, असे ठरवले. त्यावेळी गवळी आणि उमेश दोघांचे वय साधारणपणे अठरा असावे. गवळीच्या नात्यातील एक भाऊ लोहगाव मध्ये हातभट्टी विक्रीचा धंदा करत असे. तो धंदा कसा करतो? हे बघण्यासाठी सलग आठवडाभर गवळी आणि उमेश चव्हाण त्या हातभट्टीच्या धंद्यावर जाऊन धंदा कसा चालतो? याचे निरीक्षण करायचे. आता ही माहिती उमेश चव्हाण यांच्या घरी कळायला वेळ लागला नाही. त्यावेळी आजोबांनी वडिलांना न सांगण्याच्या अटीवर केलेल्या झणझणीत, तिखट कान- उघाडणीमुळे पुन्हा दारूचा धंदा टाकण्याची आणि तिकडे फिरकण्याची वेळच आली नाही.
कॉलेजमध्ये गेल्यावर खांद्यापर्यंत केस वाढवणे. गुटखा खाणं. सिगारेटी ओढणं, आणि जरा जरी कोणी काही बोललं तरी तापट डोक्याचा असल्याने हातात जे मिळेल ते घेऊन समोरच्याला बदडून काढणे. हा नसला उद्योग दररोज करत असल्याने घरी तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. अशावेळी उमेश चव्हाण यांची आई म्हणायची की, “तीन मुलींच्या पाठीवर चौथी मुलगी झाली असती, तरी चाललं असतं! मी काय पाप केले? म्हणून हे पोरगं माझ्या पोटी जन्माला आलं? मात्र आता जर आईला विचारलं की, आता उमेश कडे बघून काय वाटतं? तर मात्र, "माझ्या मुलाचा मला प्रचंड अभिमान वाटतो!" हे सांगताना त्या माऊलीच्या चेहर्याडवरील आनंद बरच काही सांगून जातो.
उमेश चव्हाण सांगतात, उनाडक्या करताना, मारामाऱ्या करताना मी बराच कुप्रसिद्ध झालो होतो. अशातच मी फार काही चांगले करू शकेल, याबद्दल घरच्यांना फार मोठी शंका होती. कदाचित माझा जन्म वाया जाण्यासाठीच झाला आहे की काय? असे त्यांना वाटे. म्हणून माझ्या वडिलांनी माझे उद्योग आणि प्रताप बघून आमच्या गावातल्या वडिलोपार्जित जागेमध्ये दहा खोल्या मला बांधून दिल्या. तसेच सेंट्रींग कामासाठी लागणाऱ्या लोखंडी २००० प्लेट घेऊन दिल्या. जेणेकरून महिन्याला मला पन्नास साठ हजार रुपये मिळतील. आणि मी बसून खाल्ले तरी घर चालेल. शिवाय “एकविसाव्या” वर्षी पोरगा सुधारावा म्हणून “लग्न” लावून दिले.
३ एप्रिल २०१२ रोजी पहिली कन्या उर्वीचा जन्म झाला. आणि त्यादिवसा पासून माणिकचंद आणि रजनीगंधा नावाचे गुटखा खाण्याचे कायमचे बंद केले. गुटख्याच्या वासाचा बाळाला त्रास होऊ नये, असे माझे मलाच वाटले आणि मी गुटखा खाणे बंद केले. असे उमेश चव्हाण सांगतात.
१९ फेब्रुवारी २०१५ शिवजयंती पासून सिगारेटी ओढणे बंद केलं. क्लासिक माईल्ड नावाची सिगारेट दिवसातून दहा-बारा वेळा ओढून व्हायची. एक पाकीट ते दीड पाकीट सिगरेट २००५ ते २०१५ असे दहा वर्ष ही सवय होती. मात्र मी त्यावेळी ज्या पक्षात पुणे शहराध्यक्ष म्हणून काम करत असे, त्या पक्षातील दिवंगत ज्येष्ठ नेते एल.डी. भोसले आणि वैशाली चांदणे यांनी सिगारेट सोडण्याविषयी बोलल्यानंतर उमेश चव्हाण यांनी कायमची सिगारेट बंद केली. त्या दिवशी शिवजयंती होती. हेही ते आवर्जून सांगतात.
२०१७/१८ ला रुग्ण हक्क परिषदेची स्थापना झाली. यामध्ये अनेक नवखे कार्यकर्ते स्वेच्छेने जोडले गेले. ज्यांना पत्र कसं टाईप करायचं? कार्यक्रम कसे घ्यायचे? कोणाशी काय बोलायचं? पोलीस चौकीत कसं जायचं? कार्यकर्त्यांशी कसं बोलायचं? हेही माहीत नव्हतं त्यांना मुळापासून सर्व शिकवलं. एका कार्यकर्तीला पैसे नाहीत म्हणून तिला फॅमिली प्लॅनिंगच्या ऑपरेशन साठी येरवड्यातील मथुरा हॉस्पिटलमध्ये रोख मदत केली. त्यानंतर कित्येक दिवस ती काम करू शकत नाही, म्हणून पुण्यातल्या नवी पेठेतल्या जयहिंद नावाच्या मुकेश यांच्या दुकानातून अन्नधान्य उधारीवर घेऊन दिले. बऱ्याच कार्यकर्त्यांची गरज पूर्ण केली. त्यांना कधी नोकरासारखी, कामाला ठेवल्याप्रमाणे वागणूक दिली नाही. तर त्यांचे रोजगार उभे करून दिले. आजही कार्यकर्त्यांची मोठी फौज पुण्यासह राज्यात तयार झालेली दिसून येते. “ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही त्यांना बोट धरून शिकवलं त्यातील सर्वच जाणीव ठेवतात का”? असा प्रश्न विचारल्यावर मात्र उमेश चव्हाण हसतात. आणि सांगतात आजच्या काळात जिथे दोन भाऊ एकत्र राहत नाही. तिथे कार्यकर्ते जीवाभावाचे नसले तरी काही काळ का होईना एकत्र राहतात. त्यांचे सर्वांचे चांगलेच झाले पाहिजे. सगळे आनंदी असले पाहिजेत, बाकी ते माझ्याविषयी चांगलं बोलो किंवा वाईट. तो त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही. यातून त्यांच्या निर्मळ मनाचे दर्शन होते.
पूर्वी शीघ्रकोपी असलेले उमेश चव्हाण आता कमालीचे शांत संयमी असतात. असे वैशाली चांदणे आवर्जून सांगतात. मात्र आता दहा वर्षे उलटून गेल्यानंतर तो संयमी आणि शांत झालाय. याकाळात हजारो असंख्य लोक जवळ आले. मुळात वाचन खूप झालं. थोरामोठ्यांचा भरपूर सहवास लाभला. मोठे नेते, मोठे लेखक-व्याख्याते, विद्वान मंडळी यांच्याबरोबर मैत्री झाल्याने परिपक्वता आली. आणि प्रगल्भता वाढली.
रुग्ण हक्क परिषद निर्माण झाल्यापासून केंद्रीय कार्यालयीन सचिव पदावर असणारे दीपक पवार म्हणतात की, “उमेश चव्हाण यांची बुद्धिमत्ता अफाट आहे. प्रत्येक व्यक्तीचे बारकावे त्यांना माहीत असतात. कुठलाही विषय हाती घेण्याअगोदर त्या विषया संबंधी सखोल आणि सूक्ष्म अभ्यास झालेला असतो. संकटांमध्ये अडचणींना तोंड देत असताना, ज्यावेळी सर्व मार्ग संपतात. त्यावेळी कुठलीही अडचण असो एका चुटकीसरशी उमेश चव्हाण ती सोडवतात. मी वयाने मोठा असलो तरी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीला सॅल्यूट करतो.
लोकांना गरज पडते ती कोर्टाची, दवाखान्याची आणि त्यासाठी पैशांची. शहाण्याने कोर्टाची आणि हॉस्पिटलची पायरी चढू नये, असे जुनेजाणते लोक म्हणायचे. पण या दोन्ही गोष्टींच्या पायऱ्या चढण्यासाठी आपल्या हाती येईल तेवढा पैसा कमी असतो. कफल्लक होऊन देशोधडीला लागलेल्या व्यावसायिकांना पुन्हा उभारी दिली पाहिजे. यासाठी महारजत अर्बनची स्थापना आम्ही करत आहोत. असे उमेश चव्हाण म्हणाले. आता महारजत अर्बनची दुसरी शाखा पुण्याच्या शिवाजीनगर भागातील गोखलेनगर येथे सुरू होत आहे. रुग्ण हक्क परिषदेचा राज्यभर विस्तार झालाय. हजारो कार्यकर्ते जोडले गेलेत. प्रत्येक कार्यक्रमांना दिसणारी गर्दी बरंच काही सांगून जाते. उमेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना पुढे खूप यश येवो. महारजत अर्बनच्या ही शाखा सर्व भारत भर निर्माण होवोत. या लेखामुळे ज्यांनी ज्यांनी आत्मविश्वास गमावला आहे किंवा आपण कधीच सुधारू शकणार नाही. असे ज्यांना वाटते त्यांना हा लेख नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
-प्राचार्य वृंदा हजारे
लेखिका, रावसाहेब पटवर्धन कॉलेजच्या प्राचार्य असून रुग्ण हक्क परिषदेच्या केंद्रीय सल्लागार आणि मासिक रुग्ण हक्क वार्ताच्या मुख्य संपादक आहेत.
No comments:
Post a Comment