*संत निरंकारी मिशनच्या वतीने एक हजार बेड्सचे कोविड-१९ ट्रिटमेंट सेंटर मानवतेसाठी समर्पित*
बारामती : संत निरंकारी मिशनच्या वतीने मिशनचे बुराडी रोड, दिल्ली येथील ग्राऊंड नं.८ च्या विशाल सत्संग भवनामध्ये कोविड-१९ महामारीने ग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी एक हजार पेक्षाही अधिक बेड्सचे कोविड-१९ ट्रिटमेंट सेंटर संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरसहित दिल्ली सरकारला उपलब्ध करुन दिले जात आहे. सरकारच्या सहयोगाने या ट्रिटमेंट सेंटरमध्ये बेड इत्यादि व रुग्णांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था संत निरंकारी मिशनकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सत्येन्द्र जैन यांनी आरोग्य विभागाच्या टीम समवेत या जागेची पाहणी केली आणि समाधान व्यक्त करुन याठिकाणी संत निरंकारी मिशनच्या वतीने कोविड-१९ ट्रीटमेंट सेंटर तयार करण्यास अनुमति प्रदान केली. संत निरंकारी मिशनने या कार्यामध्ये पुढाकार घेतल्याबद्दल संबंधित मंत्र्यांनी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांना धन्यवाद दिले.
याशिवाय भारतातील सर्व सत्संग भवन कोविड लसीकरण केंद्रांसाठी उपलब्ध करुन देण्याबाबतही मिशनच्या वतीने भारत सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास मंजूरी मिळाली असून मिशनची देशभरातील शेकडो सत्संग भवने कोविड लसीकरण केंद्रांमध्ये परिवर्तित झालेली आहेत. कित्येक निरंकारी भवन ‘कोविड -19 ट्रिटमेंट सेंटर’ म्हणून परिवर्तित करण्यात येत आहेत. त्याचबरोबर संत निरंकारी मिशनची कित्येक सत्संग भवनं मागील बऱ्याच कालावधीपासून क्वारंटाईन सेंटर म्हणून संबंधित प्रशासनांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
भारतात कोविड-१९ चा प्रादुर्भाव झाल्यापासूनच संत निरंकारी मिशनकडून राशन-लंगर वाटप करण्यापासून ते मा.पंतप्रधान सहायता निधी आणि अनेक राज्य सरकारांच्या मुख्यमंत्री सहायता निधींमध्ये आर्थिक सहाय्यदेखिल करण्यात आले आहे. तसेच पीपीई किटस, मास्क, सॅनिटायझर इत्यादीचा पुरवठाही वैद्यकीय कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याशिवाय देशभर सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या सर्व उपक्रमांमध्ये संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी शिकवणूकीची झलक पहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment