बारामती लोकसभा मतदार संघातील वीज उपकेंद्रांचे प्रश्न तातडीने सोडवा-खा. सुप्रिया सुळे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 10, 2021

बारामती लोकसभा मतदार संघातील वीज उपकेंद्रांचे प्रश्न तातडीने सोडवा-खा. सुप्रिया सुळे

*बारामती लोकसभा मतदार संघातील वीज उपकेंद्रांचे प्रश्न तातडीने सोडवा*
*खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून विजेच्या प्रश्नांचा आढावा*
पुणे, दि. १० (प्रतिनिधी) - बारामती लोकसभा मतदार संघातील संघातील इंदापूर, भोर, पुरंदर, हवेली आणि खडकवासला विधानसभा मतदार संघात प्रस्तावित असलेली महावितरणची उपकेंद्रे लवकरात लवकर सुरू करून घ्यावीत, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली. याशिवाय पावसापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत असेही त्यांनी सांगितले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी आज मतदार संघातील विजेच्या प्रश्नांचा आढावा घेतला. 
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, पुणे विभागीय मुख्य अभियंता सचिन तालेवार, बारामती विभागाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, पुणे ग्रामीणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, रास्तापेठ मंडळाचे अधीक्षक अभियंता राऊत, गणेश खिंड मंडळाचे अधीक्षक अभियंता तगडपल्लीवार, बारामती मंडळाचे अधीक्षक अभियंता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, भोर तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे, विक्रम खुटवड, मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे, सासवड शहराध्यक्ष राहुल गिरमे, हेमंतकुमार माहुरकर, दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, अतुल झगडे, हवेली तालुका अध्यक्ष भरत झांबरे, वेल्हा तालुका अध्यक्ष संतोष रेणुसे, किरण राऊत, खडकवासला विधानसभा शहराध्यक्ष काकासाहेब चव्हाण, ग्रामीणचे अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे, महावितरणचे मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले, कोथरूड विभागाचे बाराथे, पर्वती विभागाचे दराडे, केडगाव विभागाचे एडके, बारामती विभागाचे लटपटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. 
मतदार संघातील बहुतांशी ग्रामपंचायतीकडे थकीत असलेली वीजबिले तसेच कृषीपंपाची बिले जास्तीत जास्त भरली गेली, तर निधीची उपलब्धता होऊन कामे मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा अंकुश नाळे यांनी व्यक्त केली असता रणजित शिवतरे यांनी, कोणाची बिले थकीत आहेत आणि कोणाची पूर्ण वसुली झाली आहे, याबाबत महावितरणकडून स्पष्ट माहिती वेळेवर मिळत नाही. ज्यांनी बिले भरली आहेत, त्यांचीही कामे लवकर होत नाहीत, याकडे लक्ष वेधून तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावर महावितरणने एक स्वतंत्र यंत्रणा तयार करावी. त्याद्वारे संपूर्ण चित्र स्पष्ट होऊन पुन्हा पुन्हा पाठपुरावा करण्याची गरज पडणार नाही, असा तोडगा खासदार सुप्रिया सुळे यांनी सुचवला. त्या अनुषंगाने यंत्रणा तयार करण्यात येईल, असे नाळे यांनी सांगितले. 
भोर तालुक्यातील न्हावी येथे उपकेंद्र मंजूर झाले असून ते सध्या निविदा प्रक्रियेत आहे. लवकरच ते उभे राहील. याशिवाय भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघात भुगाव आणि मुठा, नसरापूर, पुरंदर तालुक्यात कोळविहिरे आणि माहूर, इंदापूर तालुक्यात झगडेवाडी, निर्गुडे, बारामती तालुक्यात मूढाळे, हवेली तालुक्यात भैरवनाथ, ब्रह्मा या वीज उपकेंद्रांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशा सूचना सुप्रिया सुळे यांनी केल्या. मुळशी तालुक्यासाठी पिरंगुट घाटात गायरान असून तेथे उपकेंद्र होऊ शकते, अशी माहिती महादेव कोंढरे यांनी दिली. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. वारजे भागात गणपती माथा येथे उपकेंद्रांची नितांत गरज असून यासंदर्भात पुणे महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी दिली.
पुरंदरसह सर्वच तालुक्यात विजेच्या अतिरिक्त भारामुळे लाईट जाण्याचे प्रकार होतात, त्यासाठी ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवावी लागेल. याशिवाय सध्या सर्वच तालुक्यांत आणि काही महत्वाच्या गावांत कोविड सेंटर्स सुरू असून त्याठिकाणची लाईट जाणे घातक ठरू शकते, तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून कुठलाही वीजपुरवठा खंडीत होणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी केली. 
                     *चौकट*
*मोबाईल टॉवर उभे राहिले; लाईटचे काय*
खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघात बीएसएनएलचे तब्बल ५४ टॉवर मंजूर झाले असून बहुतांशी टॉवरचे काम पूर्ण होत आले आहे. लवकरच पूर्ण क्षमतेने त्यांचे काम सुरू होईल. एकीकडे मोबाईलचे टॉवर उभे रहात असताना वीजपुरवठा मात्र होत होत नाही, असे का? असा प्रश्न रणजित शिवतरे यांनी उपस्थित केला. त्यावर स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रश्न विचारत बीएसएनएलला टॉवरला वीज का नाही नाही मिळत असा सवाल केला. त्यावर लवकरात लवकर ही अडचण सोडविण्यात येईल, असे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.

No comments:

Post a Comment