मंगळवारपासून बारामतीत किमान सात दिवस कडक लॉकडाऊनची शक्यता. बारामती:-बारामती तालुक्यात कडक लॉकडाऊन लागू करा, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (रविवार) बैठकीत दिले. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, याबाबतचा निर्णय सोमवारी (दि. ३) प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे हे घेण्याची शक्यता आहेत. त्यामुळे मंगळवारपासून बारामतीत पुढे किमान सात दिवस कडक लॉकडाऊन असेल. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनचा कोणताही फायदा होताना दिसत नाही. कडक निबंध केवळ नावापुरते असून रस्त्यांवर गर्दी होत आहे.अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दुपारी बारापर्यंत मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत नसून उलट वाढतच चालली आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊनशिवाय आता पर्याय नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट करत तसे आदेश प्रशासनाने काढावेत असे सांगितले.या शिवाय तालुक्यातील सुपे येथील ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण करण्याचे निर्देश अजित पवार यांनी आज दिले आहेत. बारामतीत रुई ग्रामीण रुग्णालयात
ऑक्सिजन निर्मिती प्लांटला शासनाची मंजूरी आली असून, महिला रुग्णालय व सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातही ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.दरम्यान बारामतीतील मोठ्या खासगी रुग्णालयांनाही हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात यावेत, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली .तिसरी लाट आल्यास ऑक्सिजनचा प्रश्न या मुळे काही प्रमाणात कमी होऊ शकेल. बारामतीच्या ऑक्सिजनची दररोजची गरज १६ टन इतकी आहे, गेले काही दिवस १० टनांपर्यंतच ऑक्सिजन येत असल्याने रुग्णांचे हाल होत होते.आता येत्या २ दिवसात १६ टनांपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनेही आज बैठकीच चर्चा झाली.बारामतीला सिंगापूरस्थित कंपनीकडून मिळणारे ३० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर येत्या दोन-तीन दिवसात बारामतीला आल्यानंतर त्याचाही वापर सुरु होईल व रुग्णांना त्याचा दिलासा मिळू शकेल.
शनिवारी रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर
शनिवारी बारामतीत तब्बल ५०१ रुग्णसंख्या नोंदवली गेली. ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. बारामती शहर व तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने आता कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय उरलेला नाही.तालुक्याच्या सीमा सील करण्याची गरज गतवर्षी रुग्णसंख्या वाढल्याने बारामतीत जनता कर्फ्यु लागू करण्यात आला होता. त्या धरतीवर आता लॉकडाऊन अधिक कडक करताना निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाची साखळी तुटणे अशक्य आहे.यामुळे कडक लॉकडाऊन लावणे गरजेचे असल्याचे कळतेय.
No comments:
Post a Comment