गेल्या वर्षी मुसळधार पावसात नुकसान झालेल्या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करा-खा. सुळे यांची पाटबंधारे विभागाला सूचना - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 12, 2021

गेल्या वर्षी मुसळधार पावसात नुकसान झालेल्या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करा-खा. सुळे यांची पाटबंधारे विभागाला सूचना

*गेल्या वर्षी मुसळधार पावसात नुकसान झालेल्या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करा*
*खा. सुळे यांची पाटबंधारे विभागाला सूचना*
पुणे, दि. १२ (प्रतिनिधी) - गेल्या वर्षी मुसळधार पावसात कऱ्हा नदी दुथडी भरून वाहिली. त्यात पुरंदर आणि बारामती तालुक्यात या नदीवर असलेल्या ३० पैकी बहुतांश बंधाऱ्यांचे नुकसान झाले, तर काही वाहून गेले आहेत. यंदा पावसापूर्वी ते दुरुस्त झाले नाहीत, तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे प्रचंड मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पावसापूर्वी सर्व बंधारे तातडीने  दुरुस्त करून घ्यावेत, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
बारामती लोकसभा मतदार संघातील शेती आणि पिण्याच्या पाणी पुरवठा योजना, सध्या उपलब्ध पाणीसाठा, दुष्काळी भागातील उन्हाळी आवर्तन,  बंधारे दुरुस्तीची कामे, रिकामे झालेल्या बंधाऱ्यांचे पुनर्भरण, कालवे, बंद नळ योजना, तसेच अन्य गरजेच्या कामांचा पाटबंधारे आणि जलसंधारण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत त्यांनी आज आढावा घेतला. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता दगडे, सार्वजनिक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, धोडपकर, प्रवीण कोल्हे, विजय पाटील, अशोक लाटे, जलसंधारण विभागाच्या अधीक्षक अभियंता सुजाता हांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, भोर तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे, मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे, दिगंबर दुर्गाडे, हेमंतकुमार माहुरकर, विराज काकडे, सासवड शहराध्यक्ष राहुल गिरमे, दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार,  वेल्हा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शंकर भुरूक, खडकवासला विधानसभा ग्रामीणचे अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रम खुटवड, अमित कंधारे यांच्यासह सार्वजनिक पाटबंधारे विभागाचे उपअधीक्षक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते.
कऱ्हा नदीवर पुरंदर आणि बारामती तालुक्यात एकूण ३० बंधारे आहेत. त्यांपैकी १८ बंधारे पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असून उर्वरित १२ जलसंधारण खात्याच्या अखत्यारीत आहेत. यांतील पावसामुळे पडझड झालेल्या सर्व बंधाऱ्यांची दुरुस्ती अत्यावश्यक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यानुसार कामे सुरू असून बहुतांश दुरुस्ती पूर्ण होत आली आहे. उर्वरित कामे पावसापूर्वी पूर्ण होतील, असे आश्वासन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे आणि जलसंधारणच्या अधीक्षक अभियंता सुजाता हांडे यांनी दिले. 
भोर तालुक्यात गुंजवणी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या जमिनी डोंगराळ भागात माथ्यालागत आहेत. तथापि येथून काढण्यात आलेली बंद नळ योजना खालील बाजूस असल्याने शेतीला पाणी कसे मिळणार असा संभ्रम शेतकरी वर्गात आहे, ही बाब जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि विक्रम खुटवड यांनी लक्षात आणून दिली. त्यावर खुलासा करताना बंद नळ योजना ही तज्ज्ञ अभियंत्यांच्या मार्गदर्शनानुसारच करण्यात येत असून धरणातील पाण्याच्या दाबावर प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीपर्यंत पोहोचणार आहे. याबाबत कोणीही चिंता करण्याचे कारण नाही, अशी ग्वाही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याशिवाय मुळशी धरणातील पाण्याचा वाढीव कोटा, खडकवासला धरणात होत असलेले प्रदूषण, तेथील सुरक्षा व्यवस्था, वीर धरणातून नीरा गावात पिण्यासाठी येणाऱ्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न करणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. 
                *चौकट*
*उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांसोबत लवकरच बैठक*
बारामती लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यांतील गावांना पुरेसा पाणीपुरवठा करणे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन अन्य प्रश्नांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत एकत्र बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यानुसार लवकरात लवकर बैठक घेऊन हा प्रश्न निकालात काढण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment