*बारामती लोकसभा मतदार संघातील दुर्गम भागासाठी आरोग्य केंद्र आणि वीजपुरवठा द्या*
*खा. सुळे यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट*
मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) - बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी तालुक्यात मोसे या दुर्गम आणि डोंगराळ खोऱ्यामध्ये असलेल्या गावांतील नागरिकांच्या सोयीसाठी दासवे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. याशिवाय मुळशी आणि वेल्हा तालुक्यातील दुर्गम भागात वीजपुरवठा तसेच काही ठिकाणी वीज उपकेंद्रे उभारण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन सुळे यांनी याबाबत लेखी निवेदन दिले. बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, वेल्हा तालुका अध्यक्ष संतोष रेणुसे आणि दासवे गावचे माजी सरपंच शंकर धिंडले यावेळी उपस्थीत होते. दासवे येथील आरोग्य केंद्राबरोबरच दुर्गम भागात वीज पुरवठा आणि बारामती लोकसभा मतदार संघात विविध ठिकाणी अत्यावश्यक असलेली वीज उपकेंद्रेही उभारण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोसे खोऱ्यात एकूण १८ गावे आहेत. ही सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या डोंगराळ व अतिदुर्गम भागामध्ये आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्याच्या सुविधेसाठी तब्बल ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुठा किंवा ३७ किलोमीटर अंतरावर असलेल्या पानशेत येथील आरोग्य केंद्रांत जावे लागते. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्यात रुग्णांची अतिशय गैरसोय होते. या परिसरात दासवे येथे शासकीय जागा उपलब्ध असून तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यास या भागातील नागरिकांना त्याचा उपयोग होईल, असे सांगत सुळे यांनी या गावांसाठी दासवे येथे नविन आरोग्यकेंद्र मंजूर व्हावे, अशी मागणी केली आहे.
मुळशी आणि वेल्हे तालुक्यातील काही गावे, वाड्या-वस्त्या डोंगराळ व अतिदुर्गम भागात आहेत. त्याठिकाणी अजूनही वीज पोहोचलेली नाही. या तालुक्यातील गावांना लाईट देण्याकरिता महावितरण कंपनीने विकास आराखडा तयार केला आहे. त्या आराखड्यानुसार या गावांना, वाड्यांना व वस्त्यांना वीज देण्यासाठी १२ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव महावितरण कडून जिल्हा नियोजन समितीकडे सादरही केलेला आहे. तरी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत खास बाब म्हणून या तालुक्यांसाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
*वीज उपकेंद्रे उभारावीत*
बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती तालुक्यात मुढाळे, करंजे, अंजनगाव, इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी, निरगुडे, हवेली तालुक्यातील वारजे, भोर तालुक्यातील कामथडी (मोहरी), पुरंदर तालुक्यातील बेलसर, वीर, वेल्हे तालुक्यातील पासली, मार्गासनी तसेच दौंड तालुक्यातील रोटी येथे महावितरणची वीज उपकेंद्रे उभरावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
No comments:
Post a Comment