*कोरोनामुळे बारामती लोकसभा मतदार संघात निर्माण झालेल्या स्थितीचा खा. सुळे यांच्याकडून आढावा*
पुणे, दि. ६ (प्रतिनिधी) - कोरोनामुळे बारामती लोकसभा मतदार संघात सध्या निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यासंदर्भाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत लसीकरण, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स व औषधांची उपलब्धता आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अन्य पदाधिकारी, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदार संघाबरोबरच एकूणच पुणे जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रांची सध्याची स्थिती काय आहे, तेथे उपचार घेत असलेल्या पेशंटची संख्या, त्यांना मिळत असलेल्या उपचार आणि अन्य सुविधा, खाटांची उपलब्धता, ऑक्सिजनची सध्यस्थिती, रेमडीसीवीर आदी बाबींवर यावेळी सर्वांगीण चर्चा झाली. याबरोबरच सध्या सुरू असलेल्या कोव्हीशिल्ड लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली लसीकरण केंद्रे, त्याठिकाणी होत असलेली गर्दी पाहून योग्य नियोजन करणे, त्यासाठी लाभार्थ्यांची आगाऊ नोंदणी करणे, जादा गर्दी न होऊ देणे, केंद्रांवर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची योग्य काळजी घेणे आदी सूचनाही यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment