उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामतीतील कोरोना प्रार्दुभाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 20, 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामतीतील कोरोना प्रार्दुभाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा


*उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामतीतील कोरोना प्रार्दुभाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा*
 
*कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जनजागृती करा;*नागरिकांनी गाफिल राहता कामा नये* *म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या-उपमुख्यमंत्री अजित पवार*

     बारामती दि. 20 :  बारामती शहरासह ग्रामीण भागात  कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि कोणीही गाफील राहून चालणार नाही, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तसेच ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या, तसेच पॉझिटिव्हीटी रेट पाहून निर्बंध शिथील करण्यातबाबतचे निर्णय प्रशासनाने घ्यावेतअसे  निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.  
            बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पंचायत समिती उपसभापती  रोहित कोकरे, उपमुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव नंदकुमार काटकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे,  अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,  उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, पाटबंधारे विभागाचे  कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे,  एकात्मिक विकास समन्वय व पुनर्वलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सीजन उपलब्धता,  आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
  उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती शहरासह ग्रामीण भागात  कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.  तथापि  कोणीही गाफील राहून चालणार नाही, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. कोरोना पश्चात होणाऱ्या म्युकर मायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या. पॉझिटिव्हीटी रेट पाहून निर्बंध शिथील करण्यातबाबतचे निर्णय प्रशासनाने घ्यावेत. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण जादा आहेत त्या ठिकाणी हॉट स्पॉट घोषित करून लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी सहा मिनिटे चालायची सोपी टेस्ट करुन घ्या, जर  ऑक्सिजन कमी झाल्याचे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घेवून पेशंटला ॲडमिट करावे,  अशा सूचनाही त्यांनी दिल्या.  बारामती तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोणत्या वयातील  व्यक्ती दगावल्या व  त्यापैकी किती व्यक्तींना दुसरे आजार होते याबाबतचा चार्ट वैद्यकीय अधिकारी यांनी तयार करावा असे आदेश ही त्यांनी दिले. पुढील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.  नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य तयारी केली असली तरी नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेच पाहिजे.  तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात,   
  पोलीस प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे., सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे.  संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेवून  आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.  लसीकरणाचे नियोजन योग्य प्रकारे करावे म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या इंजेक्शनचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.  शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांनी व नागरिकांच्या सहकार्याने बाधितांची संख्या घटली असली तरीही संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी  यावेळी केले.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच संभाव्य संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 नगरसेवक जय पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या 'हरित बारामती, हरित तांदुळवाडी' उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते तांदुळवाडी येथे वृक्षारोपण करुन करण्यात आला. यावेळी नागपरिषदचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच बारामती दूध संघाच्या वतीने कोरोनाने निधन झालेले कर्मचारी भगवान रामचंद्र दडस व शंकर दगडू खांडेकर यांच्या कुटुंबातील सदस्याना मदत म्हणून  प्रत्येकी 5 लाखाचे धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सुपूर्द केले.  यावेळी दूध संघाचे चेअरमन संदिप जगताप, संचालक सतीश पिसाळ , कार्यकारी संचालक डॉ. सचिन ढोपे, कामगार संघटना अध्यक्ष राहून देवकाते उपमहाव्यवस्थापक राजेंद्र शिर्के, कामगार संचालक प्रकाश काटे आदी उपस्थित होते. तसेच मॅगनम इंटरप्रायजेस, बारामती यांच्याकडून मास्क आणि ॲन्टीजन किट देण्यात आले त्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वैद्यकीय विभागास सपूर्द करण्यात आले. यावेळी मॅगनम इंटरप्रायजेसचे संतोष भोसले आणि प्रशासकीय अधिकरी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment