बारामती परिसरातील विकास कामांची पाहणी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 28, 2021

बारामती परिसरातील विकास कामांची पाहणी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

बारामती परिसरातील विकास कामांची पाहणी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

विकास कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करा --उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 बारामती दि. 28 :-  बारामती शहरासह तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे, अशा  सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच बारामती तालुक्यात सुरु असणारी विकास कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्याचे  निर्देश त्यांनी दिले.             

बारामती परिसरातील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे,  एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,  गटविकास अधिकारी राहूल काळभोर,  सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता राहूल पवार,  पाटबंधारे विभागाचे  कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे,  शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव आदी मान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.         

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती शहरासह तालुक्यात कोरोना बाधींतांची  संख्या आटोक्यात आणण्यासाठी  उपाययोजनामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव जास्त आहे. टेस्टींग व सर्वेक्षणावर भर देणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीपूर्वी तालुका पोलीस स्टेशन बारामती साठी मिळालेले नवीन वाहनाचे पूजन उपमुख्यमंत्री पवार यांचे हस्ते करण्यात आले. पियाजो कंपनी कडून बारामती च्या नागरिकांच्या सेवेसाठी 5 इलेक्ट्रिक रिक्षा नगरपरिषदेला मोफत देण्यात आल्या. याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, कंपनीचे व्यवस्थापक दियगो ग्राफी, एचआर पूजा बन्सल व कंपनीचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.
विकास कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करा
बारामती तालुक्यासह शहरात विविध विकास कामे सुरु आहेत. या विकासकामांसाठी निधीचा पुरेपूर वापर करा, सर्व अधिकाऱ्यांनी  व पदाधिकारी  यांनी समन्वयाने कामे करावीत, कामांना गती द्या, कामे दर्जेदार झाली पाहीजेत, नवीन कामे दिर्घकाळ टिकली पाहिजेत, सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली कामे कोणत्याही परिस्थितीत अपूर्ण ठेवू नका, पिणाच्या पाण्याची योजना व्यवस्थित राबवा, सर्वानीच जबाबदारी स्वीकारून कामे करणे आवश्यक आहे, असे निर्देश त्यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर दिले.

या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदीवरील सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत गॅबियन वॉल, कसबा येथील कारभारी चौक सुशोभिकरण व सादरीकरण, श्रीमंत बाबुजी नाईक वाडा सुशोभिकरण अंतर्गत भिंतीची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना दिल्या.
तालुका पोलीस स्टेशन बारामती साठी मिळालेल्या नवीन वाहनाचे पूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पियाजो कंपनी कडून बारामतीच्या नागरिकांच्या सेवेसाठी 5 इलेक्ट्रिक रिक्षा नगरपरिषदेला मोफत देण्यात आल्या, त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, कंपनीचे व्यवस्थापक दियगो ग्राफी, एचआर पूजा बन्सल व कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती शहरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन

 

बारामती नगरपरिषदेच्यावतीने वार्ड क्र. 11 येथील सामाजिक सभागृह व महाराष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळ व बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, आमराई येथील 276 सदनिकांचा भूमीपुजन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर भिसे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव यांच्यासह नगरपरिषदेचे सदस्य, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. तसेच सुपे उपबाजार कृषि उत्पन्न समितीच्या पेट्रोलपंपाचे उद्घाटनही आज उपमुख्यमंत्री पवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव गावडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप तसेच शासकीय अधिकारी , पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment