संपत्ती बाबत माहिती घेण्यासाठी भाजपचे किरीट सोमय्या बारामतीत येणार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 7, 2021

संपत्ती बाबत माहिती घेण्यासाठी भाजपचे किरीट सोमय्या बारामतीत येणार..

संपत्ती बाबत माहिती घेण्यासाठी भाजपचे किरीट सोमय्या बारामतीत येणार..

 बारामती : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे गुरुवारी आमदार गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे यांच्यासह गुरुवारी बारामतीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोमय्या आणि आमदार पडळकर हे दोघ राजकीय पटलावरील महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या माहेरघरी हे नेते कोणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिन्ही नेते गुरुवारी बारामतीत येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली.

सोमय्या यांच्या बारामती भेटीचे कारण वेगळे आहे. त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या बजरंग खरमाटे यांना लक्ष्य केलेले आहे. त्यांच्या संपत्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी सोमय्या यांनी नुकतीच सांगली येथे काही दिवसांपूर्वी भेट दिली आहे. सांगली येथे सोमय्या यांनी काही सेल्फीही काढलेले होते. आता सांगली पाठोपाठ याच पार्श्वभूमीवर सोमय्या बारामती भेटीला येत आहेत. प्रादेशिक परीवहन अधिकारी खरमाटे यांच्या काही मालमत्तांची खरेदीचे बारामती तालुका ‘कनेक्शन’ असल्याची माहिती सोमय्या यांच्यापर्यंत पोहोचली आहे. बारामतीचे भाजपचे पदाधिकारी खरमाटे ‘कनेक्शन’च्या पार्श्वभूमीवर आवश्यक माहिती जमा करत आहेत. त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी नगरपरीषदेत देखील जाणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठीच सोमय्या यांनी बारामतीकडे मोर्चा वळवला आहे. सोमय्या यांची बारामतीला हि दुसरी भेट आहे.  खरमाटे यांच्या मालमत्तासंदर्भात गुरुवारी सोमय्या अधिक माहिती घेणार आहेत.

दोन्ही नेते कोणाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार याकडे बारामतीच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे,

अनिल परब व बजरंग खरमाटे यांच्यावर सोमय्या यांनी सध्या संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या काही दिवसात आणखी काही नेते ईडीच्या रडारवर येणार असल्याचे जाहीर सांगत ‘सस्पेन्स’ वाढवला आहे. दरम्यान,बारामती तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सोमय्या यांना प्राथमिक माहिती मिळाली आहे. आणखी आवश्यक माहिती जमा करण्यासाठी भाजप पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचे मोटे यांनी सांगितले. सोमय्या यांनी अनेकांच्या मालमत्ता, भ्रष्टाचाराची भांडाफोड केली आहे. तर आमदार पडळकर हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिध्द आहेत. त्यामुळे सोमय्या आणि पडळकर प्रथमच बारामतीत एकत्रित येणार आहेत. हे दोन्ही प्रसिध्द नेते माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment