पार पडणार सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा,खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पुण्यात लग्नकार्याचे आयोजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 2, 2022

पार पडणार सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा,खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पुण्यात लग्नकार्याचे आयोजन..

* पार पडणार सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा,खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पुण्यात लग्नकार्याचे आयोजन*
पुणे, दि. २ (प्रतिनिधी):- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्यातून लग्न जुळलेल्या १२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा येत्या ३ जानेवारी २०२२ रोजी दुपारी साडेबारा वाजता पार पडणार आहे. 

देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा विवाह सोहळा पुण्यात मार्केट यार्ड येथील निसर्ग कार्यालयाच्या आवारात येत्या सोमवारी (दि. ३) दुपारी साडेबारा वाजता पार पडणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून राज्य पातळीवर हा सोहळा पार पडत असून स्वतः खासदार सुळे आणि समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे हे ऑनलाईन पद्धतीने या विवाह सोहळ्यास उपस्थीत राहणार आहेत. विवाह सोहळा दुपारी १२ वाजून ३६ मिनिटे या मुहूर्तावर पार पडणार असून तत्पूर्वी सकाळी ९ वाजता हळदी समारंभ घेण्यात येईल. भोजन व्यवस्था दुपारी दीड वाजता ठेवण्यात आली आहे. 

लग्न जुळलेल्या बाराही जोडप्यांच्या विवाहानंतर त्यांना संसारोपयोगी साहित्य मोफत देण्यात येणार आहे. त्यात कपाट, पलंग, आवश्यक भांड्याचा सेट, प्रवास खर्च इतकेच नाही, तर दुरहून येणाऱ्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील जोडप्यांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी हे सर्व साहित्य पोहोचविण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे, असे या सोहळ्याच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. लग्न सोहळ्यादरम्यान सर्व वधूना मणी मंगळसूत्र, पैंजण आणि जोडवी आदी सुहासिनीची आभूषणे प्रतिष्ठानतर्फेच देण्यात येणार आहेत. सर्व दाम्पत्यांच्या इच्छेनुसार मंगलाष्टका तर होतीलच याशिवाय यावेळी आपल्या देशाच्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचनही करण्यात येणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या राज्यव्यापी दिव्यांग सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने उपास्थित राहून नववधूवरांस आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. हा सोहळा त्यांच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment