*राज्य शासन तयार करणार दिव्यांग विवाहासाठी धोरण*-*सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे आश्वासन*
पुणे दि.३ (प्रतिनिधी): - संपूर्ण राज्यभरातील दिव्यांग आणि वंचित बांधवांचे विवाह जुळवण्यासाठी शासनस्तरावर कोणतीही योजना नाही, तसे धोरण आखायला हवे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. त्यास लागलीच दुजोरा देत पुढील सहाच दिवसांत वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन धोरण तयार करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले.
सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने आज पुण्यात पार पडलेल्या सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्यास ऑनलाईन पद्धतीने उपस्थीत राहून धनंजय मुंडे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्यातून लग्न जुळलेल्या १२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आज पुण्यात निसर्ग कार्यालय येथे पार पडला. देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून राज्य पातळीवर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वतः खासदार सुळे यांच्यासह समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्य महीला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आदी हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थीत होते. विवाह सोहळ्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करत नवदाम्पत्यांना राज्यघटनेची प्रत भेट देण्यात आली. याबरोबरच राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचनही यावेळी करण्यात आले.
यावेळी सर्व नवदाम्पत्यास आशीर्वाद आणि शुभेच्छा देताना धनंजय मुंडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीनुसार लगेचच बैठक घेऊन धोरण ठरवण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर राजेश टोपे यांनी बोलताना सुप्रिया सुळे यांच्याच पुढाकाराने राज्यात दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचे कार्यक्रम सुरू झाले असून आगामी नव्वद दिवसात हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. याबरोबरच राज्यातील दिव्यांग बांधवांचे विवाह लावून देण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शासकीय पातळीवरून आवश्यक ते सहकार्य करावे असेही त्यांनी मुंडे यांना सुचवले.
या विवाह सोहळ्यास उपस्थीत असलेले पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर पुण्यातही दिव्यांग विवाहासाठी दोन लाखाची तरतूद करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांनी बोलताना जिल्हा परिषदेच्या मार्फतही योजना राबविण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी सांगितले. ते म्हणाले, दिव्यांगांशी दिव्यांगांनी लग्न केल्यास त्यांना विवाह सोहळा आणि संसारोपयोगी साहित्यासाठी एक लाख रुपये देता येतील, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पुढील सभेमध्ये मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
हा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे संयोजक विजय कान्हेकर, रश्मी कामतेकर, सतीश पवार, संघटक अभिजित राऊत, समन्वयक दीपिका शेरखाने, विवाह सोहळ्याचे समन्वय मंडळ, जिल्हा पुनर्वसन केंद्राचे नंदकुमार फुले, भाग्यश्री मोरे, मिनिता पाटील, दत्ता भोसले, विशेष शाळांचे सामाजिक कार्यकर्ते यांनी विशेष योगदान दिले. जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यावेळी उपस्थीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या आणि या सोहळ्यास उपस्थीत सर्वांचे आभार मानले.
*चौकट*
*मैलाचा दगड ठरला दिव्यांग विवाह सोहळा*
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने आज संपन्न झालेला १२ जोडप्यांचा सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा हा एकंदरीत राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी मैलाचा दगड ठरला आहे. राज्य शासन, पुणे महापालिका आणि जिल्हा परिषद अशा सर्वच पातळ्यांवर या सोहळ्याची दखल घेतली गेली असून ही एक मोठी उपलब्धी मानण्यात येत आहे. शासनस्तरावर यासाठी तरतूद आणि ठोस धोरण तयार झाल्यास राज्यातील कोणतीही दिव्यांग व्यक्ती वंचित राहणार नाही. यासाठी राज्यभरातील दिव्यांग बांधवांनी खासदार सुळे यांचे आभार मानले आहे.
No comments:
Post a Comment