ऐतिहासिक भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून खासदार गिरीश बापट यांनी प्रयत्न करावेत - उमेश चव्हाण* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 3, 2022

ऐतिहासिक भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून खासदार गिरीश बापट यांनी प्रयत्न करावेत - उमेश चव्हाण*

*ऐतिहासिक भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून खासदार गिरीश बापट यांनी प्रयत्न करावेत - उमेश चव्हाण*

पुणे: - पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्याचा कसबा विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये समावेश होतो. सध्या पुण्याचे खासदार असलेले गिरीश बापट यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाचे सुमारे पंचवीस वर्ष आमदार म्हणून नेतृत्व केले. गिरीष बापट पुढे पुण्यनगरीचे पालकमंत्री आणि खासदार असताना देखील  त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिडे वाड्याकडे मात्र त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. आमदार आणि मंत्री असताना गिरीश बापट यांनी ठरवले असते तर ते केव्हाच भिडे वाड्याचे रूप पालटू शकले असते, मात्र आता चूक सुधारून खासदार निधीतून केंद्र सरकारच्या प्रयत्नाने देशातील जागतिक दर्जाच्या, ऐतिहासिक आशा भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक खासदार गिरीश बापट यांनी करावे, अशी मागणी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.
       स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा १ जानेवारी रोजी पुण्यातील भिडे वाडा येथे सुरू केली. ३ जानेवारी हा तर सावित्रीबाईंचा जन्म दिवस! सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी भिडे वाड्याची आठवण आल्याशिवाय राहात नाही. या भागाचे स्थानिक नेतृत्व म्हणून नगरसेवक, आमदार, मंत्री, खासदार अशी पदे भूषवित चाळीस वर्षाहून अधिक काळ राजकीय सत्ता हस्तगत करणाऱ्या गिरीश बापट यांनी त्यांची राजकीय कारकीर्द संसदेत खासदार असतानाच आपल्या घराच्या हाकेच्या अंतरावर असलेला भिडेवाडा दुरुस्त करून त्याला राष्ट्रीय स्मारक करावे! किमान यासंबंधीची घोषणा ते यावर्षी करतील, अशी आम्ही अपेक्षा करतो असेही उमेश चव्हाण म्हणाले.
       देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही संविधानवादी आहोत असे म्हणून संसदेच्या पायरीवर डोके ठेवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्त विशेष अधिवेशन आयोजित करतात. देशाचे गृहमंत्री अमित शहा पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन करतात अशावेळी गिरीश बापट यांनी ही पुढाकार घेऊन भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठीचा नारळ तात्काळ फोडावा आणि फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी जास्तीत जास्त केंद्र सरकारचा निधी आणावा, असेही रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी आवाहन केले.

No comments:

Post a Comment