*मनामध्ये ब्रह्मज्ञान स्थिरावले म्हणजे भक्तीला प्रारंभ होतो - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज*
*संत निरंकारी मिशनचा भक्ती पर्व समागम संपन्न*
बारामती (प्रतिनिधी) - “ब्रह्मज्ञानाद्वारे भक्त आणि भगवंत यांचे नाते जोडले जाते आणि हे ब्रह्मज्ञान जेव्हा मनामध्ये स्थिरावते तेव्हा खऱ्या अर्थाने जीवनात भक्तीला प्रारंभ होतो. भक्ती ही एकतर्फी प्रक्रिया नाही तर भक्त आणि भगवंत यांच्यातील एका अलौकिक नात्याला भक्ती असे नाव आहे. एका बाजुला ईश्वर भक्ताच्या प्रति आपले निस्सीम प्रेम बाळगतो तर दुसऱ्या बाजुला भक्त आपल्या हृदयामध्ये प्रेमाभक्तीचा उत्कट भाव धारण करतो. अशा प्रकारे हा एक ओतप्रोत मामला आहे.” हे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी रविवार, दि.१६ जानेवारी, २०२२ रोजी व्हर्च्युअल रुपात आयोजित केलेल्या ‘भक्ती पर्व समागम’मध्ये मिशनच्या वेबसाईटच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या जगभरातील निरंकारी भक्तगणांना आणि प्रभुप्रेमी सज्जनांना संबोधित करताना व्यक्त केले.
सद्गुरु माताजींनी सांगितले, की सार तत्व हा निराकार परमात्मा आहे आणि हे कायमदायम राहणारे सत्य आहे. या सत्याशी नाते जोडून जेव्हा आपण आपले जीवन याच निराकार ईश्वरावर आधारित करतो तेव्हा मग आमच्या जीवनात जाणून-बुजून केल्या जाणाऱ्या चुका होण्याची शक्यता फारच कमी होऊन जाते. सत्याच्या मजबूत पायावर जेव्हा आम्ही आपली भक्ती करतो तेव्हा सांस्कृतिकदृष्ट्या आमचा कल कसाही असला तरी अगदी सहजपणे आपण या भक्तीमार्गावर मार्गक्रमण करु शकतो. कोणाची नक्कल करण्याऐवजी पुरातन संतांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपले जीवन उज्ज्वल बनवायला हवे.
सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केले, की एखादी विशिष्ट क्रिया निश्चित वेळी करण्याची पद्धत म्हणजे भक्ती नव्हे. भक्ती तर क्षणोक्षणी, आपले प्रत्येक कर्म ईश्वराची जाणीव ठेवून करत सहज जीवन जगण्याचे नाव आहे. भक्ती हा एक आमचा स्वभाव बनायला हवा. एखाद्या मतलबासाठी किंवा इच्छापुर्तीसाठी जर आम्ही ईश्वराचे ध्यान करत असू तर खऱ्या अर्थाने त्याला भक्ती म्हणता येत नाही.
भक्त स्वत:च्या जबाबदाऱ्या पार पाडत आपले जीवन उज्ज्वल बनवत असतो आणि इतरांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन शक्य तितके सहकार्य करतो ज्यायोगे तो अवघ्या जगासाठी आनंदाचे कारण बनत असतो, असे सद्गुरु माताजी शेवटी म्हणाल्या.
या संत समागमामध्ये देश-विदेशातून व्हर्च्युअल रुपात सहभागी झालेल्या अनेक वक्त्यांनी भक्ती भावनेच्या संदर्भात आपल्या भावना विचार, गीत व कवितांच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
No comments:
Post a Comment