रुग्ण हक्क परिषदेचा यंदाचा जिजाई रमाई समाजभूषण पुरस्कार वाडिया कॉलेजच्या प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर यांना जाहीर!
पुणे दि.०१ - रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा जिजाई रमाई समाजभूषण पुरस्कार - २०२२ पुण्यातील नामांकित वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या वृषाली रणधीर यांना दिला जाणार असल्याची माहिती रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
वाडिया महाविद्यालय येथे प्राध्यापिका आणि आता प्राचार्य म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या वृषाली रणधीर यांनी फुले- शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये मोठे योगदान दिले आहे. मी सावित्रीबाई फुले बोलतेय! या एकपात्री नाटिकेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात हजारो प्रयोग करून सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजात आणि तळागाळात पोहोचविण्याचे काम प्राचार्य रणधीर यांनी केले आहे.
यंदाचे पुरस्काराचे ७ वे वर्ष असून गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर, कॉम्रेड मुक्ता मनोहर, मोलकरीण संघटनेच्या मेधा थत्ते, कम्युनिस्ट नेत्या किरण मोघे यांना रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने जिजाई रमाई पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यंदाही दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे येत्या १० फेब्रुवारी रोजी पुण्यातील लाल महाल येथे सायंकाळी सहा वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.
No comments:
Post a Comment