*५५व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची यशस्वीरित्या सांगता*
*ईश्वरीय इच्छेला सर्वोपरी मानण्यातच शाश्वत आनंद लपलेला आहे ! - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज*
बारामती (प्रतिनिधी) - ‘‘ईश्वरीय इच्छेला सर्वोपरी मानण्यातच निखळ शाश्वत आनंद लपलेला आहे.'' असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी रविवारी (ता.१३) महाराष्ट्राच्या 55व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सांगता समारोहात आपले आशीर्वाद प्रदान करताना केले.
सद्गुरु माताजींच्या या आशीर्वचनांद्वारे तीन दिवसीय संत समागमाची यशस्वीरित्या सांगता झाली. व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आलेल्या या संत समागमाचे थेट प्रक्षेपण मुंबईतील चेंबूर भागात स्थित असलेल्या सत्संग भवनातून मिशनची वेबसाईट व साधना टी.वी.चॅनलवर करण्यात आले ज्याचा आनंद जगभरातील भाविक भक्तगणांनी घेतला.
आनंदाच्या अवस्थेवर प्रकाश टाकताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की जेव्हा आपण ईश्वराशी नाते जोडून त्याच्याशी एकरूप होऊ लागतो तेव्हा भक्तीचा असा काही रंग चढतो, की आम्हाला निरंतर आनंदाची अनुभूती प्राप्त होते. या आनंदामध्ये भक्त अशाप्रकारे तल्लीन होतो की, मग त्याच्यावर कोणाच्या वाईट बोलण्याचा अथवा दुर्व्यवहाराचा प्रभाव पडेनासा होतो. कारण भक्तीद्वारे त्यांने शाश्वत आनंदाची अवस्था प्राप्त केलेली असते.
जीवनात एकरस अवस्था तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण अखंड एकरस राहणाऱ्या या निराकार प्रभुशी पूर्णपणे जोडले जातो. एका लोकोक्तिच्या माध्यमातून जीवनाच्या स्थितीचे वर्णन करताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की ‘दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई’ अर्थात दु:खद अवस्थेमध्ये सर्वांना देवाची आठवण होते मात्र सुखात असताना तो ईश्वराच्या प्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त करायला विसरतो. सुख आणि दु:ख हे तर जीवनाचे महत्वाचे पैलु आहेत. ते जीवनात येतच राहणार; परंतु भक्त जेव्हा भक्तीच्या रंगात रंगलेला असतो तेव्हा तो क्षणोक्षणी आनंदाची अनुभूती घेत असतो आणि प्रभुच्या इच्छेमध्ये राहून सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारतो. त्यामुळे मग दु:ख आले तरी तरी तो दु:खी होत नाही.
महात्मा गौतम बुद्धांच्या जीवनातील एका घटनेचा उल्लेख करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की एक व्यक्ती त्यांच्या अंगावर थुंकली तरीही त्यांनी आपल्या शिष्यांना शांत राहण्यास सांगितले आणि म्हटले, की यांचा माझ्याशी काहीतरी जुना हिशेब असेल तो त्याने पूर्ण केला. त्यामुळे आता हा विषय इथे संपला. त्या व्यक्तीच्या अशा दुर्व्यवहारानेसुद्धा महात्मा गौतम बुद्धांच्या आनंद अवस्थेत कोणताही फरक पडला नाही अथवा त्यांच्या मनाची शांती ढळू शकली नाही. आपणही सदैव निराकार ईश्वराशी अनुसंधान ठेवून दृढविश्वासी संतांची संगत करणे गरजेचे आहे. सत्संग, सेवा आणि नामस्मरण करत आपल्या मनाचे नाते सदैव ईश्वराशी जोडून ठेवल्याने आनंदाची अवस्था प्राप्त केली जाऊ शकते.
‘विश्वास, भक्ति, आनंद’ या तिन्ही पैलुंना जीवनात समान स्थान दिले जाऊ शकते. असे काही नाही, की आपण आधी भक्तीमध्ये परिपक्व व्हायचे, त्यानंतर विश्वास आणि मग आनंदाची अवस्था प्राप्त होईल. भक्ताला या तिन्हीवर समान रुपाने चालावे लागेल. हा कोणताही खेळ नाही, की पहिला स्तर पूर्ण झाल्यानंतर दूसरा व मग तिसरा. हा तर जीवनाचा उद्देश आहे ज्यामध्ये आपण ईश्वराच्या प्रति पूर्ण समर्पित होऊन भक्ती करुन आनंदाची अवस्था प्राप्त करु शकतो.
बहुभाषी कवि संमेलन
‘श्रद्धा भक्ती विश्वास असावा, मनामध्ये आनंद वसावा’ या शीर्षकावरील ‘बहुभाषी कवी संमेलन’ संत समागमाच्या तिसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरले. या विषयावर आधारित मराठी, हिंदी, पंजाबी, कोंकणी, अहिराणी, भोजपुरी व गुजराती अशा सात भाषांतील एकंदर १८ कविंनी अत्यंत प्रभावशाली शैलीत आपल्या भावना काव्यरुपात प्रस्तुत केल्या.
या व्यतिरिक्त समागमाच्या तिन्ही दिवशी विविध भाषांतील वक्त्यांनी आपल्या भावना व्याख्चयान, गीत, भजन, कविता इत्यादि माध्यमांतून प्रस्तुत केल्या ज्यामध्ये अनेकतेत एकतेचे सुंदर दृश्य आणि वसुधैव कुटुंबकमची अद्भुत छबी दृष्टिगोचर झाली.
संत समागमाच्या सांगता समारोहातील सद्गुरु माताजींच्या दिव्य प्रवचनाचा आनंद भाविक भक्तगणांनी घेतला आणि विश्वास, भक्ती व आनंदाची अनुभूती प्राप्त केली. त्याचबरोबर स्वत:ला या निराकार ईश्वराशी एकरुप झाल्याची दिव्यानुभव प्राप्त केला, जो या संत समागमाचा मुख्य उद्देश होता.
No comments:
Post a Comment