*समर्पणाने युक्त व अहंभावाने मुक्त असते तीच यथार्थ भक्ती होय - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 13, 2022

*समर्पणाने युक्त व अहंभावाने मुक्त असते तीच यथार्थ भक्ती होय - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज*

*समर्पणाने युक्त व अहंभावाने मुक्त असते तीच यथार्थ भक्ती होय - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज*

     बारामती (प्रतिनिधी):- ‘’समर्पणाने युक्त आणि अहंभावाने मुक्त असते तीच यथार्थ भक्ती होय’’ असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 55व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी वर्चुअल माध्यमातून सहभागी झालेल्या जगभरातील लाखो भाविक भक्तगणांना संबोधित करताना व्यक्त केले. 
भक्तीची परिभाषा समजावताना सद्गुरु माताजींनी सांगितले की, भक्ती हे दिखाव्याचे नाव नसून ती तर ईश्वराच्या प्रति आपला स्नेहभाव प्रकट करण्याचे एक माध्यम आहे ज्यामध्ये भक्त आपल्या अंगी असलेल्या गीत, नृत्य, कविता आदि माध्यमातून ईश्वरालार प्रसन्न करण्यासाठी सदैव तत्पर असतो. 
सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी प्रतिपादन केले, की वास्तविक भक्ती ही कोणत्याही भौतिक  उपलब्धिसाठी केली जात नाही. परमात्म्याच्या प्रति निरपेक्ष भावनेने केलेली भक्ती खऱ्या अर्थाने ‘प्रेमाभक्ती’ होय. भक्ती केवळ श्रवणानंदासाठी नसून ती तर ईश्वराची ओळख झाल्यानंतर हृदयापासून केली जाणारी प्रक्रिया आहे. ती कोणाचीही नक्कल करुन किंवा दिखाव्याने करता येत नाही. जर आपण केवळ पुरातन संतांच्या क्रियांचे अनुकरण करत राहिलो तर तर वास्तविक भक्ती ठरु शकत नाही. त्या संतांच्या मुलभूत संदेशामागील खरी भावना समजून घ्यायला हवी.  
सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की भौतिक जगतामध्ये मनुष्याला काहीतरी बनण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. जसे एखाद्या बालकाचा जीवनप्रवास पाहिला तर प्रथम शिक्षण, मग व्यवसाय आणि पुन्हा त्या व्यवसायामध्ये उन्नती अशा पायऱ्या तो चढत असतो. याउलट भक्तीच्या बाबतीत पाहिले तर भक्ताचा कल समर्पणाकडे असतो. तो मोठेपणाची आस न बाळगता लहानपण अंगिकारतो. काही बनण्यापेक्षा काहीही न बनण्याचा त्याचा प्रयास असतो. अशा प्रकारची विनयशीलता आणि दासभावना यांना आपल्या भक्तीमध्ये जेव्हा आपण प्राधान्य देत जाऊ तेव्हा आपण हळु हळु स्वत:ला रिक्त करत जाऊ आणि जसजसे आपण रिक्त होऊ तसतसे ईश्वराशी एकरूप होत असल्याची अनुभूती आपल्याला प्राप्त होते. 
*सेवादल रॅली*
समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ एका रोमहर्षक सेवादल रॅलीने झाला ज्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या निवडक सेवादल बंधु-भगिनींनी भाग घेतला. या रॅलीमध्ये सेवादल स्वयंसेवकांनी पी.टी.परेड, शारीरिक व्यायाम तसेच मल्लखांब, मानवी मनोरे, दोरी उड्या यांसारखे अनेक पारंपारिक खेळ सादर केले. याशिवाय मिशनची विचारधारा व सद्गुरुंच्या शिकवणूकीवर आधारित विविध लघुनाटिकाही प्रस्तुत केल्या.  
  सेवादल रॅलीला आपले आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी कोविड-19 च्या नियमांचे पालन करत मर्यादित संख्येने सहभागी होऊन सेवादल स्वयंसेवकांनी रॅलीमध्ये केलेल्या सुंदर प्रदर्शनाबद्दल त्यांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment