*मायमराठीसह संतविचारांचा जागर करण्यासाठी ‘अभंगपट महोत्सव’*
*यशवंतराव चव्हाण सेंटरचा अभिनव उपक्रम, जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन*
मुंबई: – ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने संतविचारांचा जागर करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुबई यांच्या वतीने ‘अभंगपट’ या लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून आज (दि. २७ फेब्रुवारी) यासंदर्भातील घोषणा केली.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “जगात सध्या युद्धाची परिस्थिती आहे. आपण सर्वजण आताच कोविड काळातून बाहेर पडलो. या अशा अस्वस्थ वर्तमानामध्ये आपणास संतांच्या विचारांची सर्वाधिक गरज आहे. संतांनी लोकांच्या भाषेत, म्हणजेच आपल्या मायमराठीत समतावादी विचारांचा प्रसार केला.”
संतांच्या या विचारांचा जागर करण्यासाठी ‘अभंगपट’ हा लघुपट महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु करण्यात येत असून पहिल्या वर्षी “जे का रंजले,गांजले, त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा” या संत तुकाराम यांच्या अभंगावर आधारीत लघुपट पाठवावे असे आवाहनही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.
या महोत्सवासाठी आपले लघुपट सादर करण्याची अंतीम तारीख १८ एप्रिल असून महाराष्ट्र दिन अर्थात एक मे रोजी त्यांचे स्क्रिनिंग व पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. पहिल्या तीन लघुपटांसाठी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली असून काही प्रोत्साहनात्मक बक्षीसेही देण्यात येणार आहेत. यासंबंधीची अधिक माहिती www.ycpmumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दरम्यान, या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन मायमराठी आणि संतविचारांचा जागर करावा असे आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment