दौंड येथील रेल्वेच्या जागेतील नागरिकांना पर्यायी जागा दिल्याशिवाय घरे पाडू नये**खा. सुप्रिया सुळे यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 7, 2022

दौंड येथील रेल्वेच्या जागेतील नागरिकांना पर्यायी जागा दिल्याशिवाय घरे पाडू नये**खा. सुप्रिया सुळे यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट*

*दौंड येथील रेल्वेच्या जागेतील नागरिकांना पर्यायी जागा दिल्याशिवाय घरे पाडू नये*
*खा. सुप्रिया सुळे यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट*
दिल्ली दि. ७ (प्रतिनिधी) - दौंड येथे रेल्वेचा नवा मार्ग तयार होणार असून यासाठी काही घरे पाडावी लागणार आहेत. त्यासाठी येथील रेल्वे लाईनच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरे सोडण्याच्या नोटीसा आल्या आहेत. वास्तविक गेल्या  गेल्यातीन-चार पिढ्यांपासून हे लोक येथे राहत आहेत, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुन्हा रेल्वे मंत्रालयाकडे केली.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन सुप्रिया सुळे यांनी त्यांना या मागणीचे निवेदन दिले. या मुख्य मागणीबरोबरच बारामती शहरातील तीन हत्ती चौक ते कोर्ट परिसर दरम्यान नगरपालिका सर्व्हिस रोड बांधत आहे. त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

 बारामती येथील तीन हत्ती चौक ते कोर्टदरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचा काही भाग हा रेल्वे खात्याच्या मालकीचा आहे.‌ही जागा भाडेतत्वावर देण्यास रेल्वे खाते तयार आहे. तथापि कोविड काळानंतर नगरपालिकेसाठी ही रक्कम मोठा बोजा ठरत असून ती माफ करावी अशी नगरपालिकेची मागणी आहे. या रस्त्याचे बांधकाम, देखभाल व दुरुस्ती यांचा संपूर्ण खर्च करण्यास नगरपालिका तयार आहे, तरी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

दौंड येथील रेल्वेच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्यांची घरे सोडावी लागल्यास त्यांनी कुठे जावे हा मोठा प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे हे संभाव्य विस्थापन थांबवण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी लागेल. याबाबत यापूर्वीही रेल्वे प्रशासन आणि मंत्रालय पातळीवर आपण पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटी घेऊन हा प्रश्न लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे, असे सुळे यांनी सांगितले. दौंड येथील या नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत आपण विस्थापित होऊ देणार नाही. त्यांना पर्यायी जागा मिळवून देण्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न चालूच राहतील, असेही त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment