*जीवनामध्ये सुख प्राप्त करायचे असेल तर विवेक जागृत ठेवावा लागेल - नंदकुमार झांबरे*
बारामती - (प्रतिनिधी):- देव ज्यांच्याबरोबर असतो त्याला काहीच कमी पडणार नाही. आजच्या माणसाकडे पैसा आहे गाडी बंगला आहे पण विवेक नाही, आणि हा विवेक जोपर्यंत तुमच्यामध्ये जागृत होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होणार नाही असे उदगार सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांनी काढले.
संत निरंकारी मिशनच्या वतीने शेटफळ गढे येथील निरंकारी भवनात २४ एप्रिल रोजी सायंकाळी मानव एकता दिवस निमित्ताने निरंकारी सत्संग सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी प्रमुख व्यासपीठावरून श्री. झांबरे बोलत होते.
मानव एकता दिवसाचे महत्व सांगताना श्री. झांबरे पुढे म्हणाले, युगप्रवर्तक बाबा गुरुबचनसिंहजी यांनी आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून विश्वबंधुत्व आणि एकोप्याचा संदेश जगभरात दिला. त्याचबरोबर समर्पित गुरुभक्त महान सेवादार चाचा प्रतापसिंहजी व अन्य भक्तांचेही या दिवशी आपण स्मरण करतो. ज्यांनी मानवतेच्या भल्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले याची जाणीव याची आठवण आम्हाला असली पाहिजे यासाठीच आम्ही मानव एकता दिवस साजरा करत असल्याचे सांगितले.
प्रवचनाच्या शेवटी श्री. झांबरे म्हणाले संत निरंकारी मिशन हे सत्याचा दरबार आहे, सत्याचा प्रचार करत आहे सदगुरू सत्य आहे ज्ञान सत्य आहे हा भाव मनामध्ये ठाम होईल त्यावेळेसच आमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल.
सदर सत्संग सोहळ्यास बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने, शेटफळ गढेचे माजी सरपंच हनुमंत वाबळे यांच्यासह बारामती, इंदापूर तालुक्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. सदर सोहळा पार पाडण्यासाठी शेटफळ शाखेचे भीमराव मचाले, मदनवाडी शाखेचे डॉ. राजेंद्र नरुटे, सेवादल, सेवादार भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले तर मंचसंचालन बारामती शाखेचे संचालक शशिकांत सकट यांनी केले.
No comments:
Post a Comment