पत्रकारांना शासकीय समित्यांवर संधी देण्याबाबत सकारात्मक विचार करणार : मंत्री गुलाबराव पाटील - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 3, 2022

पत्रकारांना शासकीय समित्यांवर संधी देण्याबाबत सकारात्मक विचार करणार : मंत्री गुलाबराव पाटील

पत्रकारांना शासकीय समित्यांवर संधी देण्याबाबत सकारात्मक विचार करणार : मंत्री गुलाबराव पाटील

वृत्तपत्रांनी विक्री किंमत वाढवून आर्थिक स्थिरता निर्माण करावी : प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे

जळगाव (प्रतिनिधी)-: राजकारणी आणि पत्रकारांनी समन्वयाने काम केले तर राज्याच्या विकासाला गती मिळेल असे सांगुन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मागणीनुसार पत्रकारांना स्थानिक पातळीवरील शासकीय-निमशासकीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणुन नियुक्ती देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. मंत्रीमंडळाच्या बैठकीतही हा विषय घेऊन राज्यभरातील पत्रकारांना विविध समित्यांवर घेण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तर कोरोना नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत वृत्तपत्रांनी विक्री किंमत वाढवून आर्थिक स्थिरता निर्माण करावी यासाठी वाचकानाही आपली मानसिकता तयार करावी लागेल असे मत पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन जळगाव येथे कामगार दिनी 1 मे रोजी पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत व पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दोन सत्रात झाले. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे, आ. सुरेश भोळे (राजुमामा), महापौर सौ. जयश्री महाजन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, मनोकल्पचे संचालक मनोज वाणी, मंगळग्रह संस्थानाचे अध्यक्ष डिगंबर महाले आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांमुळेच राजकीय कार्यकर्त्यांची जडणघडण होत असते. राज्यकर्त्यांच्या चुका दाखवण्याचे आणि समाजाला दिशा देण्याचे काम स्थानिक पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत पत्रकारांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे राजकारणी आणि पत्रकारांनी समन्वयाने काम केले तर राज्याच्या विकासाला गती मिळू शकते. माझ्या वैयक्तिक जडणघडणीत तर पत्रकारांचा खुप मोठा वाटा आहे. मराठी पत्रकार संघ पत्रकारांच्या अडीअडचणीत धावून जाणारा आणि अडचणीच्या काळात वेगवेगळ्या माध्यमातून मदतीसाठी तत्पर असतो. त्यामुळे संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मागणी नुसार स्थानिक पातळीवर शासकीय, निमशासकीय समित्यांवर पत्रकारांना अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्याचबरोबर पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि राज्यभर विविध समित्यांवर संधी देण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीतही याबाबत चर्चा करू अशी ग्वाही गुलाबराव पाटील यांनी दिली. 

तर पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी कोरोनाचा सर्वाधिक फटका हा वृत्तपत्र क्षेत्राला बसला असून जाहिरातींचा व्यवसाय कमी झाल्याने आणि वृत्तपत्र कागदाच्या किंमतीसह इतर वस्तुंचे भाव वाढल्यामुळे स्वस्तात वृत्तपत्र देणे आता अवघड झाले आहे. त्यामुळे वृत्तपत्रात काम करणार्‍या पत्रकार आणि इतर कर्मचार्‍यांच्या रोजगार अस्थिर झाला आहे. देशभरातील चाळीस हजार कोटी रुपयांचा वृत्तपत्र व्यवसाय दहा हजार कोटींवर आला आहे. त्यामुळे वृत्तपत्रांनी इतर देशांप्रमाणे वृत्तपत्रांची विक्री किंमत उत्पादन खर्चाच्या तुलनेत वाढवून अस्थिरता थांबवावी. तरच वृत्तपत्र क्षेत्रात काम करणार्‍या पत्रकार अणि कर्मचार्‍यांना स्थिरता मिळेल. वृत्तपत्रात काम करणारा राज्यात आणि देशात मोठा घटक आहे. या घटकाचेही प्रश्‍न आणि अडचणी सरकारने स्वतंत्रपणे समजून घेऊन मार्ग काढावा असे आवाहन केले. 


मुकनायक व जीवनगौरव पुरस्कार वितरण 

दिल्ली येथील सबला न्यूज संपादिका सरला चौधरी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला तर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार औरंगाबाद जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा संपर्क प्रमुख कुंडलीक वाळेकर, जीवन गौरव पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील प्रकाश खंडागळे, जेष्ठ पत्रकार कैलास शिंदे यांना मुकनायक पुरस्कार तर जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले, आल्हाद जोशी, हेमंत काळुंखे, प्रकाश खंडागळे यांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


पत्रकारांसाठी विमा वितरण आणि आरोग्य तपासणी शिबीर

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र विभागातील पत्रकारांना दोन लाख रुपये अपघाती विम्याच्या प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर संचालक राजऐश्‍वर्य जैन यांच्या पुढाकारातून आर.एल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर घेण्यात आले. रेड प्लस रक्त पेढीच्या वतीने पत्रकारांसाठी रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तपेढीचे अमोल शेलार, दीपक पाटील आदींनी सहकार्य केले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी  उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी व त्यांच्या पदाधिकार्‍यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment