*खेलो इंडिया स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ-क्रीडा मंत्री सुनील केदार*
*शिवछत्रपती क्रीडापीठ येथील 'खेलो इंडिया' सराव शिबिराला भेट*
पुणे, दि. २९ : हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या 'खेलो इंडिया' स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ करून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना ३ लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी २ लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी १ लाख रुपयांचा प्रोत्साहन पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केली.
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडापीठ सुरू असलेल्या 'चौथी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा' सराव शिबिराला भेट दिल्यानंतर खेळाडूंशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सहसंचालक चंद्रकांत कांबळे, क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, सुहास पाटील, नवनाथ फडतारे आदी उपस्थित होते.
क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले, शासनाने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथे खेलो इंडियातील यशस्वी खेळाडूंचा सत्कार केला होता. यावर्षीदेखील महाराष्ट्र यशस्वी होईल आणि संपूर्ण देशाला कौतुक वाटेल असा खेळाडूंचा सन्मान केला जाईल. खेळाडूंनी उत्तमता, जिद्द आणि उद्दिष्टावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. खेळाच्या माध्यमातून समानता आणि क्षमता साधली जात असल्याने सामाजिकदृष्ट्याही क्रीडा विकास आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी सर्व खेळाडू समर्पित भावनेने आणि पूर्ण क्षमतेने सराव करीत आहेत. कोरोनाकाळात सर्व शक्य नसताना आपल्या कौशल्यात कमतरता येऊ दिले नाही. अत्यंत मध्यम वर्गातील कुटुंबातील असूनही पालकांनी त्यांच्यातील क्रीडाकौशल्य प्रतिकूल परिस्थितीतही जपले, ही बाब कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे, असे त्यांनी सांगितले.
*हात टेकायचे नाही, हार मानायची नाही..*
खेळाडूंचा उत्साह वाढवताना श्री.केदार म्हणाले, खेळाच्या माध्यमातून देश घडविणारी पिढी अपेक्षित आहे. जगात पुढे जाणाऱ्या देशांनी क्रीडा विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. हात टेकायचे नाही, हार मानायची नाही, यशाला गवसणी घातल्याशिवाय परतायचे नाही असा निश्चय करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र पहिलाच राहील असे यश मिळवून परत या, आशा शब्दात त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
*महाराष्ट्र यशाची परंपरा कायम राखत प्रथम स्थान कायम राखेल*
श्री.केदार म्हणाले, खेलो इंडियाच्या गेल्या तीन स्पर्धांमध्ये राज्याने अव्वल स्थान मिळवले आहे. महाराष्ट्राच्या यशाची परंपरा कायम राखत यावर्षीदेखील प्रत्येक खेळाडू पूर्ण प्रयत्न करून राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. खेळाडूंसाठी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. ही क्रीडानगरी परिपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे. दोन वर्षे कोरोनामुळे समस्या असतानादेखील खेळाडूंचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. यावर्षी क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री.बकोरिया म्हणाले, सराव शिबिरातील खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. प्रवासाचा त्रास खेळाडूंच्या कामगिरीवर होऊ नये म्हणून त्यांना विमानाने हरियाणात नेले जाणार आहे. यावर्षी मणिपूर राज्यातील थांगता आणि हरियाणाचा गटका या दोन खेळांमध्ये राज्याचे खेळाडू प्रतिनिधित्व करीत आहेत. पाचव्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी आतापासून तयारी सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
*चौथ्या स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी खेळाडू सज्ज*
हरियाणा येथे ३ ते १३ जुन २०२२ या कालावधीत चौथ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेसाठी २१ क्रीडाप्रकारात महाराष्ट्राचे ३५५ खेळाडु पात्र ठरले असून त्यांचे सराव शिबिर बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडापीठ येथे २१ मे पासून सुरू आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित हे शिबिर ३१ मेपर्यंत चालणार आहे. हरियाणातील पंचकुला येथे ४ जून रोजी स्पर्धेचे उदघाटन होणार असून १३ जून रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे. बालेवाडीतील सराव शिबिरानंतर १ ते ८ जून या कालावधीत हे सर्व संघ हरियाणाकडे रवाना होतील.
No comments:
Post a Comment