वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि पत्रकारांच्या समस्यावर 'जागर' प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली चार विभागीय अधिवेशने यशस्वी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 5, 2022

वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि पत्रकारांच्या समस्यावर 'जागर' प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली चार विभागीय अधिवेशने यशस्वी..

वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि पत्रकारांच्या समस्यावर 'जागर' प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली चार विभागीय अधिवेशने यशस्वी..
औरंगाबाद(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी राज्यात विभागवार अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर चार विभागाचे अधिवेशन यशस्वी झाले. वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि पत्रकारांच्या समस्या या विषयावर राज्यभर 'जागर' च घातला आहे. इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांचे विभागस्तरीय अधिवेशन आणि थेट वृत्तपत्रांच्या अर्थकारणावर चर्चा घडवून आणल्याने हे अधिवेशन या क्षेत्राला अधिक मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतील असे मानले जात आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर संघटनेला अधिक व्यापक करताना कोरोना काळात पदाधिकार्‍यांच्या क्षमता वापरुन अडचणीतील पत्रकार आणि इतर घटकांना मदत करण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर राज्यात पंधराशे रक्त पिशव्यांचे संकलन करुन दिले. तर पत्रकार संघाकडून जिल्हास्तरावर अनेक ठिकाणी रुग्णवाहिका प्रशासनासाठी उपलब्ध करुन दिल्या. बातमीबरोबरच अडचणीच्या काळात सामाजिक भान जपण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. तर वर्तमानपत्रांना लागणार्‍या कागदापासून वेगवेगळ्या साहित्याचे वाढलेले दर आणि वर्तमानपत्रांची विक्री किंमत, त्यातून गडबडलेले वृत्तपत्रांचे आर्थिक व्यवस्थापन याबाबत पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी औरंगाबाद येथे दि. 24 सप्टेंबर 2020 रोजी संपादकांची गोलमेज परिषद घेऊन बदललेल्या परिस्थितीनुसार वृत्तपत्रांनी विक्री किंमत वाढवण्याची भूमिका मांडली. या परिषदेला दैनिक पुढारीचे संपादक धनंजय लांबे, सकाळचे कार्यकारी संपादक दयानंद माने, पुढारीचे युनिट हेड कल्याण पांडे, लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकीक, परिषदेचे निमंत्रक आणि पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.प्रभू गोरे, ज्येष्ठ संपादक संतोष मानूरकर, पत्रकार संघाचे विभागीय संघटक वैभव स्वामी, राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांच्यासह औरंगाबाद, जालना, अहमदनगर जिल्ह्यातील चाळीस वृत्तपत्रांचे संपादक उपस्थित होते.  दोन वर्षात जवळपास तीनशेपेक्षा अधिक वर्तमानपत्रांनी किंमती वाढवून मुंडेंच्या भूमिकेला स्वीकारले. लोकपत्रकार भागवत तावरे यांनी वृत्तपत्राच्या अर्थकारणावर घेतलेली प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची मुलाखत राज्यातील दोनशे पेक्षा अधिक दैनिकांनी प्रकाशित करुन भूमिकेला समर्थन दिले. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व विभागस्तरावर अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला. पहिले विभागीय अधिवेशन प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे रविवार दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्‍वास आरोटे, विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांच्यासह मराठवाडा विभागातील संपादक, पत्रकारांच्या उपस्थितीत घेण्यात आले. कोकण विभागाचे अधिवेशन ठाणे येथे केंद्रीय मंत्री कपिल पाटील, विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत  दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी झाले. तर विदर्भ विभागाचे अधिवेशन नागपूर येथे दि. 23 एप्रिल 2022 रोजी माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार, आमदार राजाभाऊ पारवे, संपादक श्रीकृष्ण चांडक, संपादक श्रीपाद अपराजित, संपादक भास्कर लोंढे, संपादक सुदर्शन चक्रधर, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब देशमुख व महेश पानसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. खानदेश उत्तर महाराष्ट्र विभागाचे अधिवेशन जळगाव येथे 1 मे 2022 रोजी मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे, आ. सुरेश भोळे (राजुमामा), महापौर सौ. जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, मनोकल्पचे संचालक मनोज वाणी, मंगळग्रह संस्थानाचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार संघटनेने सर्व विभागात अधिवेशने घेऊन पत्रकारांच्या समस्यावर चर्चा घडवली आहे. वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि पत्रकारांच्या अडीअडचणीवर विभागीय अधिवेशनाच्या माध्यमातून वसंत मुंडे यांनी राज्यभर ‘जागर’ च चालवला आहे. समाजाचे प्रश्‍न मांडणार्‍या वृत्तपत्र आणि पत्रकारांचे प्रश्‍नांची उघडपणे चर्चा होऊ लागल्याने कोरोनानंतर अडचणीत आलेल्या या वृत्तपत्र क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी विभागीय अधिवेशने महत्वाची भूमिका निभावतील असे मानले जात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागात विभागीय अधिवेशने होण्याची ही पहिलीच वेळ. औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष झाल्यानंतरही वसंत मुंडे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील समितीची पत्रकारांरोबर खुली चर्चा उपक्रम राबवला याची राज्यभर चर्चा झाली होती. पुन्हा एकदा पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यभर पत्रकारांच्या प्रश्‍नावर आणि वृत्तपत्रांच्या अर्थकारणावर चर्चा घडवून आणली आहे.

No comments:

Post a Comment