मुंबई दूरदर्शनचा चेहरा आणि आवाज कायमचा हरपला....ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांचे मुंबईत निधन.
केडगाव प्रतिनिधी : नवनाथ खोपडे
दि.७ जून :-मुंबई दूरदर्शन केंद्रावर नमस्कार मी प्रदीप भिडे...असं म्हणत भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज मुंबईत निधन झालं आहे. ते 65 वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते. दूरदर्शनमध्ये अनेक वर्षं वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते. त्यांच्या निधनानंतर माध्यमविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात २ ऑक्टोबर १९७२ ला झाली. प्रदीप भिडे १९७४ पासून वृत्तविभागामध्ये अनुवादक म्हणून दूरदर्शनमध्ये दाखल झाले. अभिनेत्री स्मिता पाटील, भक्ती बर्वे, ज्योत्सना किरपेकर हे सगळे त्यांचे समव्यावसायिक होते. वयाच्या २१ व्या वर्षी भिडे यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली. मुंबई दुरदर्शनवर गेल्या ४२ वर्षांहून अधिक काळ त्यांनी सातच्या बातम्यांमधून प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी सांगितल्या, ज्यांच्या भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमीची धग समजली. भिडे यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेलं वृत्तनिवेदन आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.तसेच कामगार विश्व, इ-मर्क या कंपनीत जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केलं आहे.१९८० मध्ये त्यांनी खार येथे प्रियंका स्टुडिओची स्थापना केली. तिथे त्यांनी 'प्रदीप भिडे कम्युनिकेशन' या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसवला आणि स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती माहितीपट आणि लघुपट यावर आपला आवाज ठसविला.
No comments:
Post a Comment