मा. उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 22 जुलै चा वाढदिवस साजरा न करण्याचा केले आवाहन.. मुंबई:- अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा झालेला मृत्यू, पशुधनाची झालेली हानी, शेतजमिन व पिकांचे नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्या (22 जुलै) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी माझा वाढदिवस साजरा करु नये, वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तो निधीतून राज्यातील पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी कोणत्याही सोहळे-समारंभांचे आयोजन करु नये, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, होर्डिंग्ज् लावू नयेत, वृत्तपत्रे, टिव्ही, समाजमाध्यमांवर जाहिराती प्रसारित करु नयेत, यावर होणारा खर्च वाचवून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मदत करावी. लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
विदर्भात पडलेल्या पावसामुळे विदर्भातल्या आठ जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती होती. पावसामुळे अमरावतीच्या 30 तर तर वर्ध्याच्या 42 गावांचा संपर्क तुटला होता. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले.
No comments:
Post a Comment