*शासनाच्या आरोग्य योजनांची रक्कम पंधरा लाखाहून अधिक असताना रुग्णांची पिळवणूक का होत आहे? उमेश चव्हाण यांचा सवाल!* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 5, 2022

*शासनाच्या आरोग्य योजनांची रक्कम पंधरा लाखाहून अधिक असताना रुग्णांची पिळवणूक का होत आहे? उमेश चव्हाण यांचा सवाल!*

*शासनाच्या आरोग्य योजनांची रक्कम पंधरा लाखाहून अधिक असताना रुग्णांची पिळवणूक का होत आहे? उमेश चव्हाण यांचा सवाल!*

पुणे: - विविध आजाराने- रोगांनी ग्रासलेल्या रुग्णांसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. या सर्व योजनांची बेरीज केली तर सर्वच योजनांच्या माध्यमातून मिळणारी रक्कम ही पंधरा लाख रुपयांहून अधिक आहे. प्रत्येक रुग्णाला शासनाचे पंधरा लाख रुपये मिळू शकत असताना देखील धन दांडग्या, लुटारू हॉस्पिटलमध्ये लोकांना प्रवेश मिळत नाही, उपचार मिळत नाही. रोख पैसे भरण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी दबाव आणला जातो हे रुग्ण हक्क परिषद खपवून घेणार नाही. प्रत्येक नागरिकाला लाखो रुपयांच्या शासनाच्या आरोग्य योजना असताना रुग्णांची पिळवणूक का होत आहे असा सवाल रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केला. रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या सर्वच योजना लोकांना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू, योजनांपासून लोक वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ असे प्रतिपादन रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.
        दिवंगत नगरसेवक दयाराम राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून  उमेश चव्हाण बोलत होते. यावेळी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेविका लताताई राजगुरू, काँग्रेस नेते अभय छाजेड, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, सुवर्णाताई डंबाळे, युवा नेते कुणाल राजगुरू, प्रेरणाताई गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे शहरअध्यक्ष शैलेंद्र चव्हाण उपस्थित होते.
          रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे म्हणाले की, रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो रुग्णांना कोट्यावधी रुपयांचे उपचार मोफत मिळाले आहेत. पैसे नाहीत म्हणून कोणताही रुग्ण दगावणार नाही यासाठी आज आयोजित केलेला रुग्ण हक्क परिषदेचा आरोग्य आधार कार्ड वाटपाचा कार्यक्रम हीच दयाराम राजगुरू यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा कार्यक्रम ठरणार आहे.
     गृहराज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले की, दयाराम राजगुरू हे माझे समकालीन सहकारी मित्र होते, पुणे मनपा मध्ये आम्ही एकत्र नगरसेवक म्हणून काम केले. त्यांच्या जयंतीनिमित्त राजगुरू कुटुंबाने रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या कार्याचा केलेला प्रारंभ प्रेरणादायी आहे.
       सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड यांनी केले. कुणाल राजगुरू यांनी प्रास्ताविक केले तर नगरसेविका लताताई राजगुरू यांनी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment