बारामती मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 10, 2022

बारामती मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

बारामती मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी :- मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी आदिवासी एकता बारामती आयोजित आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य व बिरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या वतीने "जागतिक आदिवासी दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.  बारामती तालुक्यात तसेच परिसरात पुणे, धुळे, नाशिक, नगर, नंदुरबार इत्यादी जिल्ह्यांमधून नोकरी व्यवसाय निमित्त आलेल्या आदिवासी कुटुंबीयांनी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहराचे कार्याध्यक्ष मा. विशाल जाधव तर उद्घाटक मा. नितीन सातव हे होते. शेतकरी योद्धा चे संपादक व योद्धा प्रोडक्शन चे मालक पत्रकार मा. योगेश नालंदे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्ते प्राध्यापक शंकर घोडे हे होते. मा. नितीन सातव व मा. योगेश नालंदे यांनी सर्व बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे मा. विशाल जाधव यांनी सांगितले की, देशाचे मूळ मालक आदिवासी आहेत. त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केल्याप्रमाणे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमासाठी देशभर सुट्टी मिळाली पाहिजे.  आदर्श संस्कृतीचे जतन व संवर्धन करणारा दिवस फक्त आदिवासी समाजानेच नव्हे तर भारतभर सर्व समाजाने साजरा करणे अत्यंत गरजेचे आहे. आदिवासी समाजाने जल, जंगल, जमिनीचे खरे जतन करण्याचे काम केले आहे. शासनाने आदिवासी समाजाची योग्य दखल घेऊन त्यांना मान सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व आदिवासी लेखक मा. विश्वनाथ धुमाळे यांनी आदिवासी दिन साजरा का करावा या विषयी समाजाला सांगितले. आदिवासी संस्कृती प्रचारक व प्रसार करण्यासाठी अहोरात्र कष्ट करून ते समाजाचे प्रबोधन करत आहेत. आदिवासी क्रांतिकारक यांचे महत्त्व विश्वनाथ धुमाळे यांनी समाजाला सांगितले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष शेळके, परिचय सोमनाथ गावित,स्वागत प्रकाश कोकणी तर कार्यक्रमाचे नियोजन आदिवासी एकता बारामती   यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपत जाधव यांनी केले तर आभार मुकुंद वसावे यांनी मानले. कार्यक्रमाला शेकडो आदिवासी समाजाचे कार्यकर्ते व कुटुंबीय उपस्थित होते.

No comments:

Post a Comment