शहरी , ग्रामीण पत्रकारांचे मार्गदर्शक
मा.संजयजी भोकरे साहेब..
मुंबई:- आदरणीय साहेब,आज तुमचा वाढदिवस. तुम्हाला अत्यंत मन:पूर्वक शुभेच्छा! माझ्या एकट्याच्याच नव्हे, तर तुम्हाला मानणार्या राज्यातील हजारो पत्रकारांच्या शुभेच्छा! तुमची कर्तबगारी तुम्हाला यापुढे अधिक यश मिळवून देईल, असा विश्वास महाराष्ट्रातील पत्रकारांना निश्चितपणे आहे. वाढदिवस हे निमित्त आहे. या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव होतोच. पण या शुभेच्छा एका दिवसापुरत्या नाहीत, 365 दिवसांकरिता आहेत.
तुम्ही आम्हा तरुण पत्रकारांचे मार्गदर्शक आहात. एकीकडे तुमच्यासारखे आदर्श नेतृत्व आणि दुसरीकडे तुमच्या कामाच्या झपाट्याने भारावलेले आम्ही सगळे पत्रकार. त्यातूनच एक शक्ती आपोआप निर्माण होत आहे. तुमचे नेतृत्व माझ्यासारख्यांना भावले, याची कारणे अतिशय वेगळी आहेत. अगदी मोकळेपणाने सांगतो. समाजाच्या आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी स्वत:ला झोकून दिलेत. अविरत काम करण्याची तुमची धमक हे तुमचे विलक्षण सामर्थ्य आहे. मेहनत आणि जिद्द तुमच्याकडून शिकावी. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघासाठी तुम्ही किती मेहनत घेता हे आम्ही रोज पाहत आहोत. एकीकडे संघटनेची वाढ करताना तुम्ही संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन आणि श्री.अंबाबाई तालिम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती देखील केली.
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचे नेतृत्व तुम्ही करत आहात आणि लवकरच देशातील पत्रकारांचे नेतृत्वही तुम्ही कराल, ही काही आता काल्पनिक गोष्ट राहिलेली नाही. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना मोठी शक्ती तुम्ही देत आहात. पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठीची तुमची तळमळ तुमच्या प्रत्येक दिवशी आम्हाला जाणवते आहे. तुम्ही स्वत:पुरते कधीच पाहिले नाही. प्रत्येक विषयात आपले पत्रकार बांधव कसे उभे राहतील, त्यांना विविध सुविधा कशा निर्माण होतील याचा विचार तुम्ही करता आणि हेच तुमचे मोठेपण भावले आहे. आज समाजात स्वत:खेरीज दुसर्याचा विचार करणारी माणसे फार कमी आहेत. स्पष्ट बोलणारी आणि निर्भीडपणे मत मांडणारी तुमच्यासारखी माणसे ही समाजाची गरज आहे. तुमच्या स्वभावामध्ये स्पष्टपणाचे एक सुंदर मिश्रण झाले आहे. कोणाला ते आवडेल, कोणाला आवडणार नाही, पण तुमच्या कोणत्याही कामात बघतो, पाहतो हे शब्द तुमच्या कोषात नाहीत. काम करायचे म्हणजे तुम्ही करून टाकता. तुमच्या स्वभावात स्वच्छता, स्पष्टता आणि पारदर्शकता जाणवणारी आहे. तुमच्यापासून माझ्यासारखी लहान माणसे जे काही शिकले, ते हेच शिकले आहे की, काम करताना स्पष्टता ठेवा. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पत्रकारांची बांधणी करण्याचे काम आपण करत आहात, त्यामुळे तुमची नाळ महाराष्ट्राशी जोडली गेलेली आहे. हे तुमच्या कामाच्या तडफेमुळे दिसते आहे.
राज्यातील ग्रामीण व शहरी भागात संघटनेत काम करणार्या प्रत्येक पत्रकाराला व वृत्तपत्राशी संबंधीत प्रत्येक घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाने नेहमीच आग्रही भूमिका घेतलेली आहे. याच माध्यमातून संघाने पत्रकार संरक्षण कायद्यासाठी दिलेल्या लढ्याला यश मिळून पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आला. तसेच पत्रकारांसाठी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनाशासनाने जाहीर केली हे देखील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केलेल्या पाठपुराव्याला आलेले यश असून यामागे राज्य संघटक म्हणून आपले असणारे मार्गदर्शन आणि प्रेरणा महत्वाची ठरली.
राज्यातील बहुसंख्य वृत्तपत्रांचे संपादक तसेच पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात महाराष्ट ्रराज्य मराठी पत्रकारसंघाशी जोडले गेले आहेत. राज्यातील कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नागपूर, पश्चिम महाराष्ट, गोवा, बेळगाव या भागात संघटनेन सभासदांच्या विविध प्रश्नांवर मोर्चे, आंदोलने उभारुन हा पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणण्याच्या दृष्टीने स्वतंत्र लढा दिला. राज्य मंत्री मंडळातील डझणभर मंत्र्यांकडे या कायद्यासाठी राज्य पत्रकार संघाने पाठपुरावा केला होता. संघटनेने तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार व गृहमंत्री ना. सुशिलकुमार शिंदे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देऊन हा कायदा राज्य शासनास अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे हा कायदा अंमलात येणे शक्य झाले. आपल्याच पुढाकारातून सांगली, सोलापूर, कोहापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी पत्रकार भवन उभारण्यात आले आहे. याबरोबरच देशाच्या राजधानीतही पत्रकार भवन उभारले आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांनाही या सवलती मिळाव्यात अशी आपली भूमिका आहे. ग्रामीण भागासह वर्तमानपत्रातील श्रमिक पत्रकार, मुक्त पत्रकार, छायाचित्रकार यांच्या संरक्षणासाठी व लढ्यासाठी संघाने व आपण स्वत: नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या निमित्ताने या लढ्याला काहीसे यश मिळाले आहे. मात्र इतरही लाभ पत्रकारांना मिळवून देण्याचा संघटनेचा आणि आपला प्रयत्न आहे. संघाच्या वतीने दरवर्षी घेतल्या जाणार्या राज्यस्तरीय अधिवेशनात पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करुन मागण्यांचे ठराव शासनाकडे पाठवून त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा केला जातो. राज्यातील पूर परिस्थिती आणि गत दोन वर्षापासून सुरु असलेली कोरोना महामारी यातही आपण आणि संघाने मदतीचा हात पुढे केला. होईल ती मदत राज्यातील पत्रकारांनी पुरविली.
पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार यांना एक लाख रुपये रोख स्वरुप असलेला जीवनगौरव पुरस्कार आपल्याच कल्पनेतून सुरु झाला आणि अनेक मान्यवरांना आपण संघाच्या माध्यमातून सन्मानित केले.आपल्या संकल्पनेतून पत्रकार संघाने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत राज्यभरातील पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोफत हेल्मेट वाटप केले. आपले कार्य हे पत्रकार संघापुरते मर्यादीत नसून आपल्या सांगली येथील श्रीअंबाबाई तालीम संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही आपण शासनाचा छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविला आहे. आपले हे कार्य असेच यापुढे अविरत सुरु रहावे, हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
शब्दांकन : विश्वासराव आरोटे
राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई
No comments:
Post a Comment