डिजिटल माध्यमातून बातम्या तातडीने वाचकांपर्यंत पोहोचतात : संजय पाटील
औरंगाबाद : डिजिटल माध्यमाने गेल्या दोन दशकांत अभूतपूर्व प्रगती केली आहे. डिजिटल माध्यमातून बातम्या तातडीने वाचकांपर्यंत पोहोचतात. परिणामी वाचकांचाही ओढा डिजिटल माध्यमांकडे वाढतो आहे. वाचकांना एका क्लिकवर तात्काळ बातम्या मिळत असल्याने वृत्तपत्र संकेतस्तळांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. वाचकांची वाढती पसंती, पेजव्ह्यूज आणि प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगवान राहण्याच्या स्पर्धेतून वृत्तपत्र संकेतस्थळाच्या कामात गेल्या काही वर्षात आमूलाग्र बदल झाले असल्याचे मत छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी संजय पाटील यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या औरंगाबादेतील विभागीय कार्यालयात शुक्रवारी त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली.
पुढे बोलताना संजय पाटील म्हणाले की, डिजिटल माध्यमात पत्रकारिता करताना केवळ बातमीचे ज्ञान असून पुरेसे नाही. इंटनेटच्या महाजालात दर सेकंदाला माहितीची भर पडत असते. त्यात आपली बातमी वाचकाला प्राधान्याने दिसावी यासाठी बातमीवर करावे लागणारे तांत्रिक संस्कार किती महत्त्वाचे आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे. वृत्तपत्र आणि टेलिव्हिजन पत्रकारितेचा एक साचा निश्चित झालेला असून त्यानुसारच दैनंदिन पातळीवर काम केले जाते. मात्र वृत्तपत्राच्या संकेतस्थळाचे काम म्हणजे कॉपी-पेस्ट असा ढोबळ समज आजही अनेकांचा असून तो चुकीचा आहे. तातडीने बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान, व्हिडीओची वाढती मागणी, वाचक पसंतीनुसार बातमीचे सादरीकरण आणि सोशल मीडियातील कल्पक मांडणी, यांचा विचार करून पत्रकाराला संकेतस्थळासाठी काम करावे लागते. वृत्तपत्र आणि त्याचे संकेतस्थळ यांच्यातील समन्वयाच्या अभावाकडेही लक्ष वेधले आहे, असे शेवटी ते म्हणाले.
यावेळी राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, संघटक विलास शिंगी, उपाध्यक्ष छब्बुराव ताके, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटणी, सतिश पाटील, अनिल कुलथे आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment