*मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा -दादासाहेब कांबळे*
बारामती दि. ९ : भारत निवडणूक आयोगाने
१ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर घोषित केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि नव मतदारांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.
तहसिल कार्यालय बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवडणूक नायब तहसिलदार पी. डी. शिंदे आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. कांबळे यांनी भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. कार्यक्रमांतर्गत एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्या ९ नोव्हेंबर २२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. शनिवार १९ नोव्हेंबर, रविवार २० नोव्हेंबर, शनिवार ३ डिसेंबर आणि रविवार ४ डिसेंबर २०२२ या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मतदार नोंदणीसाठीचे अर्ज, दावे व हरकती स्वीकारणे आदींसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. तर २६ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती निकालात काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे. संक्षिप्त पुनरिक्षण काळात विद्यार्थी, दिव्यांग महिला, देह व्यवसाय करणा-या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती, तृतीयपंथी या लक्षित घटकांसाठीही विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बारामती तालुक्यात ३ लाख ५५ हजार १४७ मतदार असून ३७४ मतदान केंद्र आहेत. निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. ९ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केलेल्या प्रारूप यादीमध्ये मतदारांनी आपले नाव, पत्ता, छायाचित्र, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत मतदारांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. दावे व हरकती सादर करण्यासाठी एनव्हीएसपी.इन या संकेतस्थळावर व वोटर हेल्पलाईन ॲपमध्ये सुविधा उपलब्ध आहे. त्या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. प्रारूप मतदार यादीमध्ये मतदाराचे नाव नसेल तर त्यांनी नमूना क्रमांक ६ चा अर्ज भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जमा करावेत अथवा मतदान नोंदणी अधिकारी किंवा सहा. मतदान नोंदणी अधिकारी, तहसिल कार्यालय, बारामती यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
*आता होणार वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी*
आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमे अंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.
No comments:
Post a Comment