पुणे :- बेकायदा दस्त नोंदणीचे लोण राज्यभर गेले आहे. या प्रकरणी पुण्यासह राज्यातील सात जिल्ह्यांतील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळात दिली,आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, माधुरी मिसाळ आणि सिद्धार्थ शिरोळे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले, 'राज्यात गेल्या दोन वर्षांत तुकडेबंदी कायदा आणि स्थावर संपदा तथा मालमत्ता (विकास आणि नियमन) कायदा (रेरा) या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन होत आहे. तसेच सक्षम प्राधिकरणाचे खोटे ना-हरकत प्रमाणपत्राच्या आधारे दहा हजार ६३५ मालमत्तांची बेकायदा दस्त नोंदणी केल्याची बाब अंशत: खरी आहे.पुण्यात तुकडेबंदी कायदा आणि रेरा या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन करून दस्त नोंदणी करण्यात आल्याचे तपासणीनंतर निदर्शनास आले. त्यानंतर पुणे शहरातील सर्व २७ दस्त नोंदणी कार्यालयांत नोंदविण्यात आलेल्या दस्तांची तपासणी करण्यासाठी तपासणी पथकाचे गठन राज्य शासनाकडून करण्यात आले होते. या तपासणी पथकाने केलेल्या तपासणीत तुकडेबंदी कायदा आणि रेरा या दोन्ही कायद्यातील तरतुदींचे पालन न करता दहा हजार ५६१ दस्तांची नोंदणी झाल्याचे उघडकीस आले.पुण्यासह ठाणे, नाशिक (सिन्नर, बागलाण, निफाड),औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी अशा सात जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारची बेकायदा
दस्त नोंदणी, गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे, असेही महसूल मंत्री विखे पाटील यांनी या वेळी सांगितले.निलंबन, बदली, चौकशी, समज पुणे शहरातील सर्व २७ दस्त नोंदणी कार्यालयांच्या तपासणीत बेकायदा दस्त नोंदणी केलेल्या दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबन, बदली, विभागीय चौकशी, समज अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे, असेही महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment