अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून पीडित मुलीवर सत्तूर आणि कोयत्याने सपासप वार करून खुनी हल्ला; एपीआय, 2 पीएसआय, कॉन्स्टेबल तडकाफडकी निलंबित..
बार्शी :- मुली सुरक्षित नसल्याचे अनेक उदाहरणे समोर येत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील एका गावात खळबळजनक घटना घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की,अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग मनात धरुन अल्पवयीन पीडित मुलीवर घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर आरोपींना तातडीने अटक न केल्याने बार्शी शहर पोलीस ठाण्यातील चार जणांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक
सुनिल फुलारी यांनी निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि एका हेड कॉन्स्टेबलचा समावेश आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 8) केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मंगरुळे, महिला पोलीस उपनिरीक्षक सारिका गुटकुल, हेड कॉन्स्टेबल अरुण भगवान माळी अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.कर्तव्यात कसूर करणे, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न करणाऱ्यांवर अशाच प्रकारे कारवाई केली जाईल. त्यामुळे पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे.हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सांगितले. अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. 6) रात्री आठच्या सुमारास घडली होती.पीडित तरुणी ही अल्पवयीन असून तिच्यावर रविवारी दोघांनी अत्याचार केले होते. त्यानंतर मुलीने दोघांविरुद्ध रविवारी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.दुसऱ्या दिवशी या गुन्ह्याच्या तपास कामाच्या अनुषंगाने पीडित मुलीचे आई-वडील पोलीस ठाण्यात गेले होते.त्यावेळी पीडित मुलगी घरात एकटीच होती. त्यावेळी संशयित आरोपी अक्षय माने आणि सिद्धेशवर दळवी हे मुलीच्या घरी आले.त्यांनी सत्तूर आणि कोयत्याने सपासप वार केले. या
हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि कपाळाला दुखापत झाली. तसेच हल्ल्यात तिच्या उजव्या हाताची दोन बोटे तुटली.हल्ल्यात बेशुद्ध झालेल्या पीडित तरुणीला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या प्रकारानंतर आरोपी माने आणि दळवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेत संशयित आरोपींना तातडीने अटक न
केल्यामुळे पोलीस ठाण्यातील चार जणांना
तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment