*खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा*
*खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट*
दिल्ली :- पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. इतकेच नाही, तर उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रही प्रदूषित होत आहे. यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे केली.
केंद्रीय वने, पर्यावरण व कामगार मंत्री भूपिंदर यादव यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी खडकवासला धरणाबरोबरच राम नदी आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राबाबतही चर्चा केली. बारामती लोकसभा मतदारसंघातील जलस्रोतांच्या प्रदूषणाची माहिती देऊन यावर उपायोजना करण्याबाबत लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे शहर आणि पुढील काही तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यात रासायनिक घटकांचाही समावेश असून पिण्यासाठी खास राखुन असलेल्या या जलस्रोतांतील प्रदूषित पाणी पिऊन रोगराई पसरण्याचा धोका नाकारता येणार नाही. याशिवाय उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र देखील प्रदूषित झाले आहे, असे खासदार सुळे यांनी यादव यांना सांगितले
उजनी धरणात मिसळत असलेल्या प्रदूषित पाण्यामुळे येथील खास ओळख असणाऱ्या स्थलांतरीत पक्षांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याबरोबरच बावधन परिसरातील राम नदीचाही प्रश्न त्यांनी यावेळी उपास्थित केला. वाढत्या नागरिकीकरणामुळे राम नदीचे पाझर अडले असून त्याचा परिणाम नदीच्या जलसंकलनावर होत आहे. हे सर्व मुद्दे केंद्रीय मंत्र्यांना समजावून सांगून येथील जलस्रोतांचे संवर्धन, प्रदूषण आणि इतर मुद्यांबाबत सहकार्य करण्याची मागणी त्यांनी केली. पर्यावरणाचे संवर्धन आणि जलस्रोतांचे बळकटीकरण आदी मुद्यांसाठी त्यांचे सहकार्य मिळेल हा विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या.
चालू वर्षाच्या सुरुवातीलाच बारामती येथे शंभर खाटांचे इएसआयसी रुग्णालय उभे करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. याशिवाय पालखी महामार्गावरील दिवे घाटाच्या रुंदीकरणास वन खात्याच्या परवानगी अभावी अडथळे येत होते. तो अडथळाही भुपेंद्र यादव यांच्याकडून दूर झाला असून आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्याने रुंदीकारणाचा मार्ग सोपा झाला आहे. या दोन्ही कामांसाठी खासदार सुळे यांनी यादव यांचे यावेळी आभार मानले.
No comments:
Post a Comment