*यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे कर्तृत्वान महिलांना ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’- खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा*
मुंबई: यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्त्री-शक्तीला सलाम करण्यासाठी मागील वर्षापासून ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजेच दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा केली.
या पुरस्कारांसाठी आजपासूनच म्हणजे १८ मार्च पासून अर्ज मागविण्यास सुरु झाले असून अंतिम मुदत ३० एप्रिल २०२३ ही असल्याचे सुळे यांनी सांगितले. पुरस्काराचे स्वरुप २५ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असून पुरस्कारार्थीची घोषणा जून मध्ये करण्यात येणार आहे. देशाला पथदर्शी ठरलेले महिला धोरण महाराष्ट्रात मंजूर झालेल्या दिवशी म्हणजे २२ जून रोजी हे पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पुरस्कारांमध्ये कृषी क्षेत्रासाठी 'यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कार' या नावाने दिला जाणार असून या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, शेतीत अभिनव प्रयोग करणाऱ्या शेतकरी महिलेची निवड करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार 'यशस्विनी साहित्य सन्मान पुरस्कार' या नावाने ओळखला जाईल. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्या महिलेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रात दर्जेदार खेळाडू घडविणाऱ्या महिलेस 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येईल. तर औद्योगिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलेस 'यशस्विनी उद्योजिका सन्मान पुरस्कार' देण्यात येणार आहे.
सामाजिक क्षेत्रात विधायक व रचनात्मक कार्य करुन महाराष्ट्राच्या विकासात भर टाकणाऱ्या महिलेस 'यशस्विनी सामाजिक सन्मान पुरस्कार' प्रदान करण्यात येईल. याबरोबरच पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारास 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार' देण्यात येणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
या पुरस्काराच्या अटी-शर्ती, नियम वाचण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या www.chavancentre.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या वेबसाईटवरच गुगल फॉर्ममध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सुळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८८११४९३९६ या मोबाईल क्रमांकावर किंवा women@chavancentre.org या इमेलवर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment