बारामतीत एस टी बसेसच्या पाट्यांना चुन्याचा उतारा....
सोमेश्वरनगर :-( हेमंत गडकरी)
एकीकडे विकासाचे रोल मॉडेल म्हणून राज्यात डंका वाजत असलेल्या बारामतीत एस टी महामंडळाचा मात्र गलथान कारभार सुरू असून अनेक एस टी बसेसच्या पाट्यांना मात्र चुन्याने रंगवले जात आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दूरदृष्टीने बारामती तालुक्याचा सर्वदूर विकास होत आहे. अनेक योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. अजित पवारांचे सर्व विकास कामांवर वैयक्तिक लक्ष असते. बारामती बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे कामही वेगात सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कसबा येथे बस स्थानक उभे केले आहे.
या ठिकाणी मात्र प्रवाशांची सोय होण्याऐवजी गैरसोयच होत आहे. प्रवाश्यांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. एस टी बसेसचे वेळापत्रक पूर्ण कोलमडले असून प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच अनेक बसेस ना चालक पाट्या लावतच नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा संभ्रम होतो. शिवाय अनेक बसेस ना गावाची नावे असलेल्या पाट्या चुन्याने लिहल्या जातात. त्यामुळे उन्हात त्या पाट्या नीटपणे दिसत नाहीत. शिवाय बऱ्याचदा त्यात व्याकरणाच्या चुका असतात. त्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी अडचणी येतात.
त्यामुळे आगार प्रमुखांनी याकडे तात्काळ लक्ष देवून गाड्यांना नवीन पाट्या लावाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
................
चौकट - अवैध प्रवाशी वाहतूकदारांचा सुळसुळाट..
सध्या गावोगावी यात्रांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे एस टी स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे. याचा फायदा अवैध प्रवाशी वाहतूक करणारे घेत आहेत. असे वाहतूक करणारे राजरोसपणे बस स्थानकाच्या आतून प्रवाशी घेवून जात आहेत. याबाबत एस टी महामंडळ व पोलिस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. अगदी पोलिसांच्या समोर अवैध प्रवाशी वाहतूक करणारे उघडपणे फिरत आहेत
No comments:
Post a Comment