*बारामती विधानसभा मतदार संघात मतदार यादी पडताळणी कार्यक्रम सुरू*
बारामती, दि. २४: विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत २०१ बारामती विधानसभा मतदार संघामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी २१ ऑगस्टपर्यंत घरोघरी भेट देऊन मतदार याद्यांची पडताळणी करणार आहेत, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार ही कार्यवाही सुरू आहे. या मध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारकार्डला आधार लिंक करणे, ८० वर्षावरील मतदारांची पडताळणी करणे, मतदार ओळखपत्रावरील छायाचित्राची पडताळणी करणे, १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवकांचे मतदार यादीत नाव नोंदणी करणे. मयत मतदाराचे नाव यादीतून कमी करणे आदी कामे करणार आहेत.
या पडताळणीमुळे मतदार यादीचे शुद्धीकरण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय सहायकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहाय्य करावे. तसेच मतदार संघातील नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. नावडकर यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment