अधिस्विकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्ताव पाठवणार्यांना पाठीशी घालणार नाही : मुख्यमंत्री ना. शिंदे
मुंबई / प्रतिनिधी :-अधिस्वीकृती समिती संदर्भात चुकीचे व नियमबाह्य प्रस्ताव पाठवणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव डॉ.विश्वासराव आरोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ.आरोटे यांनी नुकतीच शिष्ट मंडळासह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व माहिती व जनसंपर्क महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांची मुंबई येथे भेट घेतली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने राज्यातील विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना या आशयाचे निवेदन दिले आहे.
याविषयीची माहिती संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. याबाबत योग्य ती चौकशी करून चुकीचे काम करणार्यांना कधीही पाठीशी घालणार नाही. अधिकारी व कर्मचार्यांनी शासनाचे आपण कर्मचारी आहोत, याची जाणीव ठेवावी असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी राज्य पत्रकार संघाच्या दिनदर्शिका, डायरी, घड्याळ व स्मृतिचिन्ह देऊन ना. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश सचिव डॉ. विश्वास आरोटे, पत्रकार संघाचे संजय फुलसुंदर, मराठवाडा वि.स.प्र. कुंडलीक वाळेकर, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष विसे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment