*भूमि अभिलेख विभागाच्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन*
बारामती, दि. ४: भूमि अभिलेख विभागाच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink व https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ऑनलाईन सेवांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
'संगणकीकृत सातबारा, आठ अ, फेरफार व मिळकत पत्रिका' सेवामध्ये डिजीटली स्वाक्षरीत सातबारा, आठ अ, फेरफार व मिळकतपत्रिका डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व मिळकतपत्रिका सर्व शासकीय कामाकरीता वैध आहेत. डिजीटली स्वाक्षरीत सातबारा उतारा १५ रुपये, मिळकतपत्रिका उतारा डाऊनलोड करण्यासाठी ग्रामीण क्षेत्रासाठी ४५ रुपये, तर नगरपालिका क्षेत्रासाठी ९० रुपये इतके शुल्क आकारले जाते.
संकेतस्थळावरील 'संग्रहित दस्तावेज' (ई-रेकार्डस्) सेवेमध्ये विभागाशी संबंधित जुने अभिलेख डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. महाभूनकाशामध्ये (गाव नकाशे) भूमि अभिलेख विभागाकडील गावनकाशे तसेच महानगरपालिका, नगरपालिकेच्या नगर भूमापन हद्दीतील नगरभूमापन नकाशे नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध आहेत.
'फेरफार अर्ज प्रणाली - ई-हक्क' सेवेमध्ये वडीलोपार्जित घर ,जमिनीवर वारसाची नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 'आपली चावडी' सेवेमध्ये गावी असलेल्या चावडीप्रमाणे डिजिटल चावडी संकेतस्थळावरही सातबारा, मालमत्तापत्रक (मिळकतपत्रिका), मोजणी विषयक सर्व मोजणी नोटीस, फेरफार नोटीस फलकावर बघण्यासाठी उपलब्ध आहेत.
'भूलेख' सेवेमध्ये सातबारा, मालमत्तापत्रक (मिळकतपत्रिका) मराठी भाषेसह वेगवेगळ्या २४ भाषांमध्ये मोफत बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सातबारा व मिळकतपत्रिका गट क्रमांक, सिटी सर्वे क्रमांक, नाव, आडनावावरुन शोधण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. 'अधिकार अभिलेखावरील दिवाणी दाव्याबाबतची माहिती' सेवेमध्ये सातबारा व मिळकतपत्रिकेची माहिती विधी व न्याय विभागाच्या संकेतस्थळाशी जोडणी करुन सातबारा व मिळकतपत्रिका या अधिकार अभिलेखांवर असलेल्या दिवाणी दाव्याबाबतची माहिती बघण्याची सुविधा उपलब्ध आहे.
फेरफार अर्ज सद्यस्थिती तपासणी' या सेवेमध्ये सातबारा व मिळकतपत्रिकेवर घेण्यात येणाऱ्या फेरफार अर्जाची स्थिती बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मिळकतपत्रिकेवरील फेरफार अर्जाचे, दस्त नोंदणी क्रमांकानुसार फेरफार अर्जाची स्थिती नागरीकांना माहिती होते. 'फाईंड सीटीएस/सर्व्हे क्रमांक' सेवेमध्ये महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १६६६ चे कलम १२२ अन्वये अधिसूचित सर्वे / गट क्रमांकाला देण्यात आलेले नगर भूमापन क्रमांक पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
संकेतस्थळावरील 'डिजिटल स्वाक्षरीत संगणकीकृत सातबारा, आठ अ, फेरफार व मिळकत पत्रिका, 'संग्रहित दस्तावेज' (ई-रेकार्डस्) या दोन सेवा सशुल्क तर उर्वरीत सर्व सेवा निशुल्क आहेत. या संकेतस्थळावरील सशुल्क सेवेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याने खाते तयार करुन लॉगिन युझर व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. यासाठी भ्रमणध्वनी व ईमेल पत्याची आवश्यकता आहे. निशुल्क सेवा संकेतस्थळावर लॉगिन न करता उपलब्ध आहेत.
नागरिकांनी अधिक माहितीसाठी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, तिसरा मजला कृषी भवन, प्रशासकीय इमारत, बारामती या कार्यालयाशी संपर्क साधावा. तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळाचा वापर करुन ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन उप अधीक्षक भूमि अभिलेख संजय धोंगडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment