बारामती :- बारामतीत कोयता गॅंग नंतर पिस्तुल गॅंग ची हवा चालू असल्याची काही घडून गेलेल्या घटना व नुकताच घडलेल्या घटनेवरून दिसत आहे, नुकताच बारामती-पाटस रस्त्यावरील कृष्ण पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकाला सोमवारी
भर दुपारी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. पिस्तुलाचा धाक दाखवत ते पेट्रोलपंपावरील रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. या घटनेत पंपाचे व्यवस्थापक मयुर
शिंदे (वय ३२) हे गंभीर जखमी झाले. परंतु त्यांनी निकराचा प्रतिकार केल्याने दोघा चोरट्यांना ही रोकड न घेताच तेथून पसार
व्हावे लागले.सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता नेहमीप्रमाणे शिंदे यांनी पेट्रोलपंपावरील रक्कम घेतली. ती भरण्यासाठी ते दुचाकीवरून
शहराच्या दिशेने येत होते. यावेळी स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यांच्याकडील रक्कम
असणारी बॅग हिसका मारून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु शिंदे यांनी ही बॅग पोटाखाली दाबून ठेवली. बॅग हाती मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांना काही अंतरापर्यंत
फरफटत नेण्यात आले. तरीही शिंदे यांनी आपली चिकाटी सोडली नाही. चोरट्यांना बॅग मिळू नये, यासाठी जीवाचे रान केले. या घटनेत चोरट्यांनी त्यांना जबर मारहाण केली. शिंदे हे त्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी येथील
सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांना पाच ते सहा टाके पडले आहेत.बारामतीतील माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मालकीचा हा पेट्रोलपंप आहे, बारामतीत भरदिवसा अशा घटना घडणे
चिंतेची बाब आहे.सुदैवाने यात रक्कम चोरीला गेलेली नाही.बारामतीत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शहर पोलिस ठाण्याला खबर देण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात असला तरी पुन्हा एकदा बारामतीत कोयता गॅंग नंतर पिस्तूल गॅंग वाढत असल्याचे नागरीकांनी बोलून दाखविले असून गुन्हेगारी वाढत असून याला आळा घालावा अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment